महात्मा जोतिबा फुले रुग्णालयाचा होणार पुनर्विकास,विक्रोळीकरांना मिळणार सुपर स्पेशालिटी रुग्णालय

विक्रोळी येथील महापालिकेच्या क्रांतिवीर महात्मा जेतिबा फुले रुग्णालयाच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. म्हाडाने पुनर्विकासाची परवानगी दिल्याने आता विक्रोळीकरांना अद्ययावत सोयीसुविधांसह सुपर स्पेशालिटी रुग्णालय मिळणार आहे. अद्ययावत ऑपरेशन थिएटर, 500 बेड, स्टाफ क्वार्टर, तळमजला अधिक 13 आणि तळमजला अधिक 21 मजली अशा दोन इमारती बांधण्यात येणार आहेत. यासाठी मुंबई महापालिका तब्बल 500 कोटी रुपये खर्च करणार आहे. दरम्यान, तीन-चार वर्षांत पूर्ण होणाऱया या सुपर स्पेशालिटी रुग्णालयामुळे पूर्व उपनगरातील विक्रोळी, कांजूर, भांडुप, पवईतील रहिवाशांना माफक दरात वैद्यकीय सुविधा मिळणार आहेत.

विक्रोळीतील कन्नमवार नगरमध्ये असलेले महात्मा जोतिबा फुले रुग्णालय हे विक्रोळी, कांजुरमार्ग, पवई आणि भांडुपमधील रहिवाशांना आरोग्यसेवा पुरवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र 1980 साली उभारण्यात आलेल्या या रुग्णालयाची इमारत धोकादायक झाल्याने सहा वर्षांपासून बंद ठेवण्यात आली आहे. शिवाय येथे अपुऱया सुविधा, आवश्यक यंत्रसामग्री नसल्याने या परिसरातील रुग्णांची मोठी गैरसोय होत होती; परंतु म्हाडाने पुनर्विकासाची परवानगी दिल्याने सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा मार्ग मोकळा झाला आहे.

म्हाडाचा अतिरिक्त भूखंडही मिळाला

विक्रोळी येथील महात्मा जोतिबा फुले रुग्णालयाची इमारत जुनी व धोकादायक झाल्याने ती पाडण्यात आली आणि रुग्णालय इमारतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला, मात्र पुनर्विकासाच्या कामात तांत्रिक अडचणी आल्याने रुग्णालय इमारतीचा पुनर्विकास रखडला होता. या रुग्णालयाशेजारी म्हाडाचा सुमारे 32 हजार 825 चौरस मीटरचा भूखंड असून तो एकत्रित करून पुनर्विकासात 500 खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभे राहणार आहे.

z महात्मा जोतिबा फुले रुग्णालयाच्या पुनर्विकासाला म्हाडाने परवानगी दिली आहे. त्यामुळे सुपर स्पेशालिटी रुग्णालय रुग्णांच्या सेवेत येणार आहे. या रुग्णालयामुळे मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, पवई या परिसरातील रुग्णांना माफक दरात उपचार घेणे शक्य होणार आहे. त्यामुळे केईएम, नायर, शीव या पालिकेच्या मुख्य रुग्णालयांवरील रुग्णसेवेचा ताण कमी होणार आहे, अशी माहिती उपनगरीय रुग्णालयांचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर यांनी दिली.