मराठी माणसा जागा हो…मुंबई झोन ‘जीएसटी’ विभाग भरतीत परप्रांतीयांची चलती, भूमिपुत्रांना ठेंगा

मुंबई-महाराष्ट्रातील बेरोजगारांसाठी लाखो नोकऱया निर्माण करणारे उद्योग,कंपन्या पळवल्या गेल्या असताना आता मुंबई झोन ‘जीएसटी’ विभाग भरतीत परप्रांतीयांचीच चलती असून भूमिपुत्रांना ठेंगा मिळाल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मुंबई झोनसाठी झालेल्या 397 पदांच्या भरतीत केवळ 10 म्हणजेच केवळ अडीच टक्के मराठी उमेदवारांना संधी मिळाली आहे. यामुळे पात्रता असूनही आपल्याला जाणीवपूर्वक वशिलेबाजीने डावलल्याचा आरोप नोकरीची संधी हुकलेल्या उमेदवारांकडून करण्यात येत आहे.

‘जीएसटी’ विभागाच्या मुंबई झोनसाठी नुकतीच भरती प्रक्रिया पार पडली. यात इन्स्पेक्टर ऑफ ‘सीजीएसटी’ या पदासाठी भरती करण्यात आली. यासाठी पदवीधर पातळीवर गतवर्षी झालेल्या भरती परीक्षेचे निकाल आणि निवड झालेल्या उमेदवारांची यादी नुकतीच प्रधान मुख्य आयुक्त कार्यालय, पेंद्रीय वस्तू व सेवा कर तथा केंद्रीय उत्पादन शुल्क मुंबई झोन विभागाकडून जाहीर केली आहे. यातील 397 पदांमध्ये केवळ दहा मराठी उमेदवार आहेत.

– ‘जीएसटी’ मुंबई झोनसाठी गेल्या दहा वर्षांपासून होणाऱया प्रत्येक भरतीमध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांना डावलण्याचा प्रकार सुरू आहे. या वर्षी अडीच टक्के निवड म्हणजे गेल्या दहा वर्षांतील सर्वोत्तम स्थिती आहे.

– महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशात बेरोजगारी प्रचंड वाढली असताना उद्योगधंदे, नोकऱया निर्माण करणे गरजेचे असताना तरुणांना आरक्षणासारखी आंदोलने आणि मंदिरासारख्या धार्मिक रंगात गुंतवून हे कारस्थान सुरू असल्याचा आरोप होत आहे.