लोकसभा निवडणुकीची नांदी; निवडणूक विभागाच्या ‘जोर बैठका’ सुरू

राज्यात लोकसभा निवडणुकीची नांदी सुरू झाली आहे. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांचे पथक प्रत्यक्ष महाराष्ट्राच्या दौऱयावर येण्यापूर्वी राज्याच्या निवडणूक विभागाकडून विभागवार आढावा बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. या बैठकांची सुरुवात उद्या, शुक्रवार पुण्यापासून सुरू होत आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत संपूर्ण पुणे विभागाचा आढावा घेऊन अहवाल तयार करण्यात येणार आहे.

राजकीय पक्षांकडून लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपासाठी एकीकडे चर्चेच्या फेऱया सुरू केल्या आहेत, तर दुसरीकडे राज्याच्या निवडणूक विभागानेही लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे आजच मुंबईतून पुण्याकडे रवाना झाले आहेत. पुण्यात उद्याची बैठक झाल्यानंतर 26 फेब्रुवारीला सातारा, 27 फेब्रुवारीला कोल्हापूर, 28 फेब्रुवारीला सांगली आणि 29 फेब्रुवारीला सोलापूरमध्ये आढावा बैठक घेणार आहेत.

ईव्हीएम कंट्रोल युनिट चोरी
पुणे जिह्यातील सासवड येथे ईव्हीएम मशीन चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या घटनेची केंद्रीय निवडणूक आयुक्तांपासून राज्य सरकारने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. मशीनच्या कंट्रोल युनिटची चोरी होण्याची पहिलीच घटना आहे. या चोरीच्या पार्श्वभूमीवर उद्या पुण्यात होणाऱया निवडणूक विभागाच्या बैठकीला महत्त्व आले आहे.

केंद्रीय पथकाचा दौरा अजून अनिश्चित
मार्च महिन्यात केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्राच्या दौऱयावर येण्याची शक्यता आहे, पण या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाच्या महाराष्ट्र दौऱयाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. केंद्रीय पथकाच्या दौऱयाच्या तारखांचे व्हॉट्सऍप मेसेज सध्या मोबाईलवर व्हायरल होत आहेत. या पथकाच्या आगमनाची अधिकृत सूचना अद्याप तरी राज्याच्या निवडणूक विभागाला केंद्राकडून मिळालेली नाही, असे निवडणूक कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.