मेहंदीने दिली ओळख, धनश्री सुरावकरची कलात्मक वाटचाल

>>मानसी पिंगळे

मेहंदी आर्टिस्ट धनश्री सुरावकर आज तिच्या कलेसाठी ओळखली जाते. लहानपणापासून मेहंदी काढण्याची आवड जोपासत, धनश्रीने या क्षेत्रात प्राविण्य मिळवलंय. धनश्री वयाच्या 11 व्या वर्षांपासून मेहंदी काढतेय. मागील पाच ते सहा वर्षांपासून व्यावसायिकपणे काम करतेय.

धनश्रीने सर्वात पहिली ऑर्डर वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी घेतली होती. मातृदिनाचे औचित्य साधत घेतलेली ही पहिली ऑर्डर आयुष्यभर लक्षात राहिल, असे ती म्हणते. यामागील मुख्य कारण म्हणजे धनश्रीची आई. सुरुवातीला धनश्रीला मेहंदी कशी काढावी याबद्दल फारशी कल्पना नव्हती पण तिच्या आईने अगदी तिचा हात धरून तिला मेहंदी काढायला शिकवलं. त्यामुळे तिचा मेहंदी क्षेत्रातील रस आणखी वाढला. लॉकडाऊनच्या काळात धनश्रीने ठरवलं आता हीच आवड व्यावसायिकदृष्टय़ा जोपासायची. त्यासाठी तिने मेहंदीचा कोर्स केला अन् हळूहळू ती मेहंदीचे ऑर्डर्स घेऊ लागली. त्याचसोबत कलेचा प्रसार करण्यासाठी इंस्टाग्रामवर मेहंदीसाठी अकाउंट सुरू केलं. त्यामुळे तिने असंख्य लोकांचं सहज लक्ष वेधून घेतलं. या सर्व गोष्टी करत असताना, तिला तिच्या आईवडिलांनी कायम प्रोत्साहन दिले. धनश्री प्रत्येक ऑर्डरसाठी स्वतः मेहंदी तयार करते. कारण तिचं असं म्हणणं आहे की बाहेरच्या मेहंदीमध्ये केमिकल असण्याची शक्यता असते, जे त्वचेसाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे मेहंदीमध्ये जास्तीत जास्त निलगिरीच्या तेलाचा वापर करत ती घरगुती मेहंदी तयार करते. जिचा अतिशय सुंदर रंग येतो आणि दीर्घकाळ टिकण्यास मदत सुद्धा होते.

लग्न, हळदी, साखरपुडा, वाढदिवस, संगीत, करवा चौथ, तीज, मेहंदी अशा अनेक कार्यक्रमांसाठी धनश्री मेहंदी काढते. वधूच्या मेहंदीत.. दोन्ही हात, पाय मिळून तिला जास्तीत जास्त चार ते पाच तास लागतात. याव्यतिरिक्त बाकी मोठमोठय़ा डिझाईन्स ती दोन ते तीन तासात पूर्ण करते. अरेबिक डिझाईन, बॉर्डर डिझाईन, पारंपरिक डिझाईन, दुल्हन मेहेंदी अशा सुंदर सुंदर मेहंदी डिझाईन्स ती अगदी सहज काढून देते. हल्लीच तिने अभिनेत्री मयुरी वाघ हिची मेहंदी काढली.