दिवसा चालक, रात्री करायचा चोऱ्या

दिवसा खासगी वाहन चालवून रात्री वाहनाचे स्पेअरपार्ट चोरणाऱया एकाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. मोहसीन शेख असे त्याचे नाव असून त्याच्याकडून काही गाडय़ांचे पार्ट्स पोलिसांनी जप्त केले आहे.

अंधेरी येथे तक्रारदार राहतात. गेल्या आठवडय़ात त्यांनी त्यांची चारचाकी एमआयडीसी परिसरात पार्क केली होती. दुसऱया दिवशी ते गाडीजवळ गेले असता त्यांची गाडी सुरू होत नव्हती. बॉनेट उघडल्यावर त्या गाडीमधील स्पेअर पार्ट चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर आणखी चार जणांच्या गाडीचे स्पेअरपार्ट्स चोरीला गेल्याची तक्रार एमआयडीसी पोलिसांकडे केली. त्याची गंभीर दखल पोलिसांनी घेतली. वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या पथकातील उपनिरीक्षक आनंदराव काशीद यांच्या पथकाने तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता एका फुटेजमध्ये मोहसीन दिसला. त्यावरून तपासाची चव्रे फिरली. मोहसीन हा जोगेश्वरी येथे राहत असल्याचे समजताच पोलीस तेथे गेले. तेथून पोलिसांनी मोहसीनला ताब्यात घेऊन अटक केली. मोहसीन हा पूर्वी एका गॅरेजमध्ये काम करत होता. त्यानंतर तो खासगी गाडय़ा चालवण्याचे काम करत होता. दिवसा गाडी चालवल्यानंतर रात्री तो चोऱया करण्यासाठी बाहेर पडायचा. तो इको, इंडिगा गाडय़ांचे बोनेट उघडून पार्ट्स चोरायचा. चोरलेले पार्ट्स तो गॅरेजवाल्यांना कमी किमतीत विकत होता. मोहसीनला अटक करून आज न्यायालयात हजर केले होते.