सोशल मीडिया स्टारचे अवघ्या 35 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन

स्वतःला आकर्षक बनवण्यासाठी लोक विविध उपाय करत असतात. यातले काहीजण लठ्ठपणा घालवण्यासाठी वजन कमी करण्याचे विविध मार्ग अवलंबत असतात. यासाठी काहीजण अपार मेहनत घेतात तर काहीजण लक्ष्य झटपट गाठण्यासाठी सोपा मार्ग निवडतात. ब्राझीलची सोशल मीडिया स्टार मिला डी जीसस ही सोशल मीडियावरून फिटनेसचे धडे द्यायची. मात्र तिचे अवघ्या 35 व्या वर्षी हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले आहे. मिला सोरायसिसने त्रस्त होती, ज्याचा उल्लेख तिने यापूर्वीच्या पोस्टमध्ये अनेकदा केला होता.

मिला मूळची ब्राझीलची असून ती अमेरिकेच्या बोस्टनमध्ये राहत होती. चार मुलांची आई असलेल्या मिलाचे नुकतेच पुन्हा लग्न झाले होते. चार महिन्यांपूर्वीच तिने जॉर्ज कोव्हॅझिकशी लग्न केले होते. मिलाचे इन्स्टाग्रामवर 60 हजारांहून अधिक फॉलोअर्स असून जवळपास महिन्याभरापूर्वी तिने आपल्याला कसलीतरी ऍलर्जी झाल्याचे म्हटले होते. यामुळे तिच्या शरीरावर पुरळ उठले होते. त्याचा फोटोही तिने शेअर केला होता. तीन महिन्यांपासून ती या समस्येशी झगडत होती. तिच्या शरीराचा 80 टक्के भाग सोरायसिसने व्यापला होता.

मिलाने 6 महिन्यांपूर्वी वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया केली होती. नोव्हेंबरमध्ये तिने शस्त्रक्रियेपूर्वीचा आणि नंतरचा फोटो शेअर केला होता. यामध्ये ती खूपच सुंदर आणि ग्रेसफुल दिसत होती. मिलाने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, एका निर्णयाने माझे आयुष्य बदलले. मिलाच्या निधनानंतर सोशल मीडियावर तिच्या फॉलोअर्सनीही शोक व्यक्त करत तिला श्रद्धांजली वाहिली.