मनसेच्या जिल्हा उपाध्यक्षाला खंडणी प्रकरणी अटक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर याला दीड लाख रुपये खंडणी प्रकरणी पेण पोलिसांनी अटक केली आहे. पेण येथील माजी नगरसेवक हबीब खोत यांचा स्टँप व्हेंडींगचा व्यवसाय आहे. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर , रफिक तडवी, शालोम पेणकर यांनी हबीब खोत यांना मनसेच्या पेण कार्यालयात बोलवून, तुम्ही स्टँप व्हेंडींगसाठीच्या लिखाणाचे जास्त पैसे घेता. तुमच्याविरुद्ध माझ्याकडे भरपूर तक्रारी आहेत. मी जर प्रकरण पुढे नेले तर तुमचा स्टँप व्हेंडींगचा परवाना रद्द होईल असा दम दिला. यावेळी आपण काहीही चुकीचे करत नाही असा हबीब खोत यांनी सांगितल्यावर संदीप ठाकूर याने चाकूचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन 3 लाखांची खंडणी मागितली होती. तडजोडीअंती खंडणीची रक्कम 2 लाखांवर आली होती. याशिवाय ठाकूर याने खोत यांच्याकडून दर महिना 40 हजार रुपये हप्त्याची मागणी केली होती.

चाकूचा धाक दाखवून जीवे ठार मारल्याची धमकी दिल्यामुळे हबीब खोत यांनी संदीप ठाकूरने पाठवलेल्या इसमाकडे 50 हजार रुपयांचा पहिला हप्ता दिला होता. यानंतर संदीप ठाकूर व त्याच्या हस्तकांनी हबीब खोत यांच्याकडे वारंवार उर्वरित पैश्यासाठी तगादा लावला होता. अखेर हबीब खोत यांनी पोलीस उपअधीक्षक शिवाजी फडतरे यांच्याकडे तक्रार केली. पोलीस उपअधीक्षक शिवाजी फडतरे, पेणचे पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी सापळा रचून उर्वरित दीड लाख रुपयांची खंडणी घेताना संदीप ठाकूर याच्या हस्तकाला ताब्यात घेतले. आपण ही खंडणी संदीप ठाकूर साठी घेतल्याचे त्या इसमाने सांगितल्यानंतर संदीप ठाकूर याला पोलिसांनी अटक केली.