सिराजला तडकाफडकी विश्रांती

हिंदुस्थानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याची वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवड झाली होती. मात्र सिराजला तडकाफडकी विश्रांती देण्यात आली असून तो हिंदुस्थानात परत आला आहे. 

सिराजने वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत सुरेख गोलंदाजी केली होती. या कसोटी मालिकेतील तो हिंदुस्थानचा दुसरा यशस्वी गोलंदाज ठरला आहे. कॅरेबियन संघाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याने 2 विकेट घेतल्या होत्या तर पोर्ट ऑफ स्पेन कसोटीत त्याने पहिल्या डावात 5 विकेट्स टिपल्या. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले. 

एकदिवसीय मालिकेतून विश्रांती दिल्यानंतर सिराज आता थेट हिंदुस्थानात परतल्याचे वृत्त आहे. सिराजचे नाव एकदिवसीय संघातही होते. पण संघ व्यवस्थापनाने अचानक त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला. 

सिराजला अचानक विश्रांती का? 

हिंदुस्थान एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची तयारीही वेस्ट इंडीजविरुद्धच्या वन डे मालिकेपासून सुरू करणार आहे. सिराज संघाचा महत्त्वाचा भाग आहे. एकदिवसीय विश्वचषकाची तयारी करत असताना सिराजला अचानक अशा मालिकेत विश्रांती का देण्यात आली, असा सवाल क्रिकेटप्रेमी उपस्थित करत आहेत. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आगामी आशिया चषकासाठी तो फिट राहावा म्हणून त्याला ही विश्रांती देण्यात आल्याचे कळते. 

सिराज हुकमाचा एक्का  

सिराजने आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये 24 सामन्यांत 20.72 च्या सरासरीने 43 विकेट घेतल्या आहेत. यापैकी निम्म्याहून अधिक विकेट त्याने हिंदुस्थानातील खेळपट्टय़ांवर आहेत. त्यामुळे आगामी विश्वचषक स्पर्धेत सिराज हा हिंदुस्थानचा हुकमाचा एक्का असणार आहे.