परदेशी पाहुण्यांना मराठी शिकवणाऱ्या मृदुला वैद्य

>> गणेश आचवल

आपल्या देशात अनेक परदेशी पाहुणे येत असतात. एखादा बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरी करत असतो, कोणी परदेशी विद्यार्थी विद्यापीठात शिक्षण घेत असतो. अशा वेळी या परदेशी पाहुण्यांना मराठी संस्कृती आणि मराठी भाषा शिकवण्याचे काम काही व्यक्ती करत असतात. त्यापैकी एक म्हणजे मृदुला वैद्य.

मृदुला वैद्य या सरकारी नोकरीत कार्यरत होत्या. मात्र मुलांच्या संगोपनार्थ आणि मुलांच्या शिक्षणाला वेळ देण्यासाठी त्यांनी सरकारी नोकरी सोडली. पुढे त्या इटालियन भाषा शिकल्या. त्या हिंदी आणि मराठीच्या शिकवण्यासुद्धा घेत होत्या. हा इटालियन भाषेचा अभ्यासक्रम शिकता शिकता इंडो इटालियन चेम्बर ऑफ कॉमर्सच्या प्रेसिडेंट सरांनी त्यांना हिंदुस्थानी संस्कृती आणि हिंदी भाषा शिकवण्याचा अभ्यासक्रम तयार करायला सांगितला. मृदुला वैद्य यांनी हे आव्हान स्वीकारले आणि विदेशी पाहुण्यांकरिता आपल्या संस्कृतीशी परिचय करून देणारा अभ्यासक्रम तयार केला. त्या सुरुवातीला हिंदुस्थानात येणाऱया परदेशी पाहुण्यांना हिंदी भाषा शिकवू लागल्या. मग त्यातूनच काही परदेशी व्यक्तींनी मराठी शिकण्याची इच्छा व्यक्त केली. हिंदीप्रमाणेच मराठी भाषेचे प्रशिक्षणदेखील त्या परदेशी लोकांना देऊ लागल्या. यामध्ये हिंदुस्थानात येणारे जर्मनी, अमेरिका, जपान, नेदरलँडचे पाहुणे होते.

मृदुला वैद्य सांगतात, ‘‘सुरुवातीला मी एका जर्मन व्यक्तीला मराठी शिकवत होते. त्यांना आपल्या मराठीतील ‘तुम्ही’ आणि ‘आपण’ या शब्दांचे महत्त्व सांगितले. मराठी भाषा कशी नाते जोडणारी आहे ते सांगितले.

अन्य भाषिकांनाही त्या मराठीचे धडे देतात. सध्या मुंबईतील एका शाळेत शिकणाऱया जर्मन मुलीलादेखील त्या मराठी शिकवत आहेत. आपल्याकडे बहुराष्ट्रीय पंपन्यात मोठय़ा पदावर कार्यरत असणाऱया काही व्यक्तींनादेखील त्या व्यावहारिक मराठी शिकवत आहेत.