गोविंदा रे गोपाळा… पावसाचा काला; वरुणराजाच्या सलामीने गोविंदांचा उत्साह शिगेला

‘बोल बजरंग बली की जय’ म्हणत मंडळाचे रंगीबेरंगी टी-शर्ट परिधान करून भल्यापहाटे घराबाहेर पडलेले गोविंदा पथकांचे जथे, सकाळपासून वरुणराजाने लावलेल्या हजेरीमुळे द्विगुणीत झालेला आनंद, नाक्यानाक्यावर उंचावर बांधलेली दहीहंडी फोडून लाखो रुपयांच्या बक्षिसांची लयलूट करण्यासाठी गोविंदा आणि गोपिकांमध्ये लागलेली चुरस, श्वास रोखायला लावणारा थरांचा थरार अन् दहीहंडी फोडताच गोविंदा पथकांसह उपस्थितांमध्ये होणारा एकच जल्लोष अशा उत्साहपूर्ण वातावरणात मुंबई, ठाण्यासह राज्यभरात गुरुवारी दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळाला. दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि उपनगरातील वाहतूक व्यवस्थेत बदल केले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तसेच जायबंदी झालेल्या गोविंदांसाठी पालिका रुग्णालयेदेखील सज्ज होती.

मुंबईतील नाक्यानाक्यावर विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्थांच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. डीजे आणि ढोल-ताशे, भलेमोठे मंडप, उंच क्रेनवर बांधलेली दहीहंडी, उपस्थितांच्या मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, गोविंदा पथकांचा उत्साह वाढवण्यासाठी सेलिब्रेटींनी लावलेली हजेरी असे चित्र यंदाही पाहायला मिळाले. दादर, वरळी, प्रभादेवी, लालबाग-परळ, गिरगाव, भायखळा, अंधेरी, गोरेगाव, बोरिवली, कांजुरमार्ग आदी भागांमध्ये दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळाला. गोविंदा पथकांना आकर्षित करण्यासाठी आयोजकांनी मोठमोठी बक्षिसे लावली होती. मुंबईपासून ठाण्यापर्यंत मानाच्या दहीहंडीला गोविंदा पथके सलामी देत होते. ‘हम भी किसीसे कम नही’ असे म्हणत गोपिकादेखील थरांवर थर रचून सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होत्या. थरांचा थरार पाहण्यासाठी आबालवृद्धांनी गर्दी केली. श्रीकृष्णाच्या वेशभूषेत आलेली बच्चेकंपनी गर्दीत विशेष भाव खाऊन गेली.

शिवडी नाक्यावर बक्षिसांची लयलूट 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा प्रभाग क्र. 206तर्फे शिवडी नाका येथे निष्ठावंतांची भव्य दहीहंडी आयोजित करण्यात आली होती. या दहीकाला उत्सवासाठी शिवसेना विधिमंडळ गटनेते अजय चौधरी, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, माजी नगरसेवक अनिल कोकीळ, सचिन पडवळ, उपविभागप्रमुख गजानन चव्हाण, विधानसभा संघटक लता रहाटे उपस्थित होते. यावेळी पथकांना रोख पारितोषिक तसेच चांदीचे नाणे देण्यात आले.

आयडियलची दहीहंडी वरळी पोलीस कॅम्प मंडळाने फोडली 

आयडियल आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आयोजित दादरच्या आयडियल गल्लीतील मानाची दहीहंडी वरळी पोलीस कॅम्प मंडळाने फोडली. तसेच महिलांची दहीहंडी विलेपार्ले येथील जॉली महिला पथकाने फोडली. सेलिब्रिटी दहीहंडी ‘दिल दोस्ती दिवानगी’फेम अभिनेत्री दुर्वा साळोखे हिने फोडली. यावेळी चित्रपटातील विजय पाटकर, तीर्था मुरबाडकर, कमलप्रीत सिंग, दिग्दर्शक शिरीष राणे हे कलाकारदेखील उपस्थित होते. ‘कलर्स’ मराठीवरील ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमातील नम्रता सांगळे, नेहा पाटील, शुभम बोराडे, समता आमणे, तनुजा शिंदे, पूर्वा साळेकर या स्पर्धकांनी नृत्य सादर करत कार्यक्रमाची शोभा वाढवली. ‘सारेगम लिटिल चॅम्प’फेम स्वरा जोशीने आपल्या गाण्याने कार्यक्रमाची रंगत वाढवली. विशेष आकर्षण म्हणजे मालाडच्या शिवसागर मित्र मंडळाने दहीहंडीच्या माध्यमातून महिलांवरील अत्याचाराला वाचा फोडली तसेच ‘स्वतःचे रक्षण स्वतः करा’, ‘अन्याय सहन करू नका’ असा संदेश दिला. मुंबई पोलिसांच्या कामगिरीलादेखील यावेळी सलाम करण्यात आला. ही दहीहंडी साईदत्त मित्र मंडळ आणि बाबूशेट मित्र मंडळ यांच्या सहकार्याने होत असते.

‘निष्ठा दहीहंडी’ उत्साहात

युवासेनेच्या वतीने शिवसेना भवनाजवळ आयोजित करण्यात आलेल्या ‘निष्ठा दहीहंडी’ला गोविंदा पथकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोठय़ा उत्साहात आणि जल्लोषात हा दहीकाला उत्सव साजरा करण्यात आला. सुमारे शंभरहून अधिक गोविंदा पथकांनी यात सहभाग घेतला. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या दहीकाला उत्सवात सहभागी होऊन गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि युवासेनेच्या माध्यमातून 2006 सालापासून पारंपरिक पद्धतीने हा दहीकाला उत्सव साजरा करण्यात येतो. निष्ठावंतांच्या या उत्सवाला मुंबईकरांनी दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिवसेना नेते दिवाकर रावते, उपनेते राजकुमार बाफना, मनोज जामसुतकर, शिवसेना सचिव सूरज चव्हाण, आमदार अजय चौधरी, सुनील शिंदे, माजी महापौर महादेव देवळे, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, महेश सावंत, विभाग संघटक श्रद्धा जाधव यांच्यासह शिवसेना आणि युवासेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. अभिनेता संतोष जुवेकर, अंकित मोहन, अदिती पोहणकर, तन्मय पाटेकर या सेलिब्रेटींनीदेखील हजेरी लावली.

जोगेश्वरी पूर्व मेघवाडी येथील हिंदमाता दहीहंडी पथकाने मुंबई आणि ठाणे येथे आठ थर रचले.

शाळांमध्येही दहीहंडीचा उत्साह

विद्यार्थ्यांना सण आणि उत्सवाचे महत्त्व पटवून देण्यासाठी शहरातील विविध शाळांमध्येदेखील दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. भांडुप येथील सह्याद्री विद्यामंदिर या शाळेतील पूर्व प्राथमिक विभागातील दहीहंडी अनुषा शैलेश धुरी या विद्यार्थिनीने फोडली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र. 193, 194 च्या वतीने विभागप्रमुख महेश सावंत यांच्या पुढाकाराने प्रभादेवी येथे दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला शिवसेना सचिव-खासदार विनायक राऊत यांनी भेट देऊन गोविंदा पथकांचे कौतुक केले. शाखा संघटक संजना पाटील आणि शाखेतील सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

आमदार सुनील शिंदे यांनी लोअर परळ, शिवालय येथे आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात लोअर परळच्या संयुक्त नवी चाळ उत्सव समितीच्या गोविंदा पथकाने पहिल्याच प्रयत्नात आठ थरांचा मानवी मनोरा रचून मानाची हंडी फोडली.

आमदार सुनील राऊत, उपनेते दत्ता दळवी आणि विक्रोळी विधानसभेच्यावतीने यंदा 11 लाख रुपयांची निष्ठावंतांची भव्य दहीहंडी कन्नमवार नगर 1, प्रबोधनकार ठाकरे चौक येथे आयोजित करण्यात आली होती. स्वयंभू हनुमान मंडळाने ही हंडी फोडली. यावेळी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.