अधिकाऱ्यांच्या मागचा चौकशीचा ससेमिरा थांबवा, म्युनिसिपल इंजिनीअर्स असोसिएशनचा आंदोलनाचा इशारा

कोरोनाच्या भयंकर लाटांमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून पालिका अधिकारी-कर्मचाऱयांनी मुंबईकरांना वाचवण्यासाठी काम केले आहे. आपत्कालीन काळात काम केलेल्या याच कर्मचारी, अधिकाऱयांच्या मागे आता ईडी, एसआयटीच्या माध्यमातून चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला आहे. त्यामुळे अधिकाऱयांमध्ये असुरक्षेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अधिकाऱयांच्या मागचा चौकशीचा ससेमिरा थांबवा अन्यथा जोरदार आंदोलन करण्यात येईल, असा इशारा म्युनिसिपल इंजिनीअर्स असोसिएशनच्या वतीने देण्यात आला आहे.

कोरोनाच्या जीवघेण्या साथीत काही अभियंते, एक उपायुक्त, एक सहाय्यक आयुक्त आणि 350 कामगार मृत्यू पावले. पालिकेचे सुमारे 10 हजारांपेक्षा अधिक कामगार आणि अधिकारी कोरोनाबाधित झाले. कोरोनाने भयंकर रूप धारण केले असताना आणि साथरोग कायदा लागू असताना प्रशासनाला अनेक निर्णय घ्यावे लागले. याचा मोठा फायदा मुंबईला झाला. लाखो मुंबईकरांचे जीव वाचले. असे असताना आता मात्र अधिकाऱयांच्या मागे चौकशीचे सत्र सुरू असून अधिकाऱयांना तपास यंत्रणांकडून नाहक मनस्ताप दिला जात असल्याचा आरोप इंजिनीअर्स असोसिएशनकडून करण्यात येत आहे.

अधिकाऱयांची नाहक बदनामी

कोरोना काळात आपत्कालीन स्थिती असतानाही निविदेतील अटी आणि शर्थीनुसार त्यांनी काम केली आहेत. अभियंत्यांनी स्वतःची कामे सांभाळून कोरोना पेंद्र चालविणे, विलगीकरण, रुग्णांचा शोध घेणे आदी कामे केली. असे असताना आता चौकशी यंत्रणेच्या माध्यमातून अधिकारी आणि अभियंत्यांना धमक्या देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे सार्वजनिक जीवनात बदनामीला समोरे जावे लागत असल्याचे म्युनिसिपल इंजिनीअर्स असोसिएशनचे अध्यक्ष महाबळ शेट्टी आणि उपाध्यक्ष रमेश भुतेकर देशमुख यांनी म्हटले आहे.