‘मातोश्री’चा हात डोक्यावर नसता तर तुम्ही कुठे असता? सुषमा अंधारे यांनी मिंध्यांना सुनावले

मिंधे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांना यापूर्वी मिळालेली मते ही निव्वळ शिवसेना, मातोश्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा डोक्यावर हात होता म्हणूनच मिळाली. तो हात आता डोक्यावरून निघाल्यानंतर काय होतं ते आपण बघूया आणि केवळ इथेच नव्हे तर शिवसेना जिथे कुठे लढते आहे तिथे बघायला मिळेल असा इशारा देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मिंध्यांना सुनावले.

कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर-राणे यांच्या प्रचारार्थ कळव्यातील विटावा परिसरात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. दरम्यान आनंद दिघेच्या नावावर आपली राजकीय पोळी भाजण्याचा शिंदे गटाचा हा अत्यंत केविलवाणा प्रयत्न असल्याचा आरोप अंधारे यांनी यावेळी केला आहे. तर म्हस्केंच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी असून म्हस्केंना उमेदवारी देऊन सगळीच मस्करी केली असल्याची मिश्कील टीका करीत अंधारे यांनी मिंधे गटाचा बुरखा फाडला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, महिला संघटक रेखा खोपकर, माजी नगरसेवक मिलिंद पाटील, काँग्रेसचे विक्रांत चव्हाण, समन्वयक संतोष जाधव, समिधा मोहिते आदी उपस्थित होते.