पराभवाच्या भीतीने भाजप आणि मित्रपक्ष सैरभैर; गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या भीतीने भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष सैरभैर झाले आहेत. त्यामुळेच ते काँग्रेस व ‘इंडिया’ आघाडीवर खालच्या पातळीवर येऊन टीका करत आहेत. गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही. राहुल गांधींवर टीका केल्याने एकनाथ शिंदेंच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला.

राहुल गांधी यांच्यावरील एकनाथ शिंदे यांच्या विधानाचा समाचार नाना पटोले घेतला. गरम झाले की, राहुल गांधी परदेशात जातात असे बाष्कळ विधान करून मुख्यमंत्री शिंदे यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. गद्दारी करून सत्ता मिळवणाऱया भाजपच्या मिंध्यांना गांधी कुटुंबाचा त्याग, बलिदान व राहुल गांधी काय कळणार? भाजप जेवढी चावी देते तेवढेच ते बोलू शकतात असे पटोले म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने शिवसेना पह्डून गद्दारी केली. भाजपच्या मदतीने सुरत व तेथून गुवाहाटीला जाऊन महाविकास आघाडीचे सरकार पाडले. ईडी कारवाईच्या भीतीने गद्दारी करून पक्ष चोरणाऱ्यांनी काँग्रेस व राहुल गांधी यांच्याबद्दल बोलू नये, नाना पटोले म्हणाले.

बावनकुळेंची तेवढी उंची नाही
बावनकुळे यांना त्यांच्या पक्षातच कोणी विचारत नाही. ते दररोज फक्त विरोधी पक्षांच्या नेत्यांवर गरळ ओकत असतात, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना तेवढेच काम दिलेले आहे. राहुल गांधी यांच्यावर बोलण्याएवढे बावनकुळे यांची उंची नाही, असा टोला पटोले यांनी लगावला.