मोदी पंतप्रधान होणार नाहीत! उद्धव ठाकरेंचा इशारा, राज्यांमध्ये भांडणं लावण्यावरून केलं शरसंधान

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी सिंदखेडराजा येथे जनसंवाद सभा घेतली. या सभेत महाराष्ट्राच्या मातीचे गुण सांगत ही माती गद्दारांना गाडणारी आहे, असे ठणकावले. त्यांनी गद्दार मिंधे आणि भाजप यांचा चांगलाच समाचार घेतला. आता जनता भाडोत्री जनता पक्षाच्या भूलथांपाना बळी पडणार नाही. गद्दारांचा आणि हुकूमशाहीचा पराभव करत इंडिया आघाडी विजयी होणारच, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा ऐकून त्यांच्या पोटात दुखते, उद्धव ठाकरे, शिवसेना कितीही प्रयत्न केला तरी संपत का नाही, हे त्यांना समजत नाही. त्यांना कल्पना नाही, शिवसेना एक पक्ष नाही, शिवसेना हा विचार आहे. वरवरची फुले त्यांनी काढली तरी महाराष्ट्राची ही माती जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. त्यामुळे आमची जमीनीत गेलेली पाळेमुळे उखडायचा प्रयत्न केला, तर एवढे खोल जावे लागेल की, ते पुन्हा जमिनीवर येऊ शकणार नाहीत, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

सिंदखेडराजा हे मातृतिर्थ आहे. येथे भेट देणे माझे कर्तव्य आहे. ज्या लढ्यासाठी मी उतरलोय, तो लढा माझा एकट्याचा नाही. महाराष्ट्रद्रोह्यांच्या विरोधात लढण्याचा आहे. महाराष्ट्रद्रोह्यांविरोधात ज्या एका मातेने आपल्या सुपुत्राला लढण्यासाठी घडवले. त्या मातेचे आशीर्वाद घेणे खूप महत्त्वाचे वाटले म्हणून मी येथे आलो आहे. संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगाजेब यांच्या जन्मस्थळाबाबत सांगितले. कदाचित तो मातीचा गुण असेल. ते ज्या मातीत जन्मले त्याचा गुण त्यांना लागला असेल मात्र, आमच्या मातीचा गुण आम्हालाही लागला आहे, हे त्यांनी विसरू नये.

तुमचे आमचे नाते काय, जय जिजाऊ, जय शिवराय, या नात्याचा अर्थ समजणे गरजेचे आहे. आज ईडी भाय, इन्कमटॅक्स भाय हे त्यांचे घरगडी आहेत. मात्र, शिवसेना फोडण्यात महत्त्वाचा वाटा ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स यांचा आहे. काही लोकांना एक नोटीस आल्यावर ते भाजपत गेले. मात्र, त्यावेळच्या काळाचा विचार केला, तर शहाजीराजांना विजापूरकरांनी तुरुंगात टाकले होते. मुलगा मोगलांशी लढतोय. एखादी आई म्हणाली असती, अरे कशाला लढतोय, वडिलांना तुरुंगात टाकले आहे. तू कशाला हे करतोस, नोकरी कर. मात्र, जिजाऊ महाराजांनी छत्रपती शिवाजी राजांना प्रशिक्षण दिले, जे इतरांना जमत नाही, ते तुझ्याकडून अपेक्षित आहे. उपऱ्यांची, परक्यांची चाकरी करणे, हे आयुष्य नाही. तर स्वराज्य स्थापन करणे हे आयुष्य आहे. शिवाजी महाराज मोगलांच्या दरबारी किंवा विजापूरच्या दरबारात वतनदार असते, तर इतके वर्ष झाल्यानंतर दैवत म्हणून आपण त्यांची पूजा करू शकलो असतो का, आणि मुळात आपण असतो का, आणि असतो तर कोण असतो, याचा विचार करा.

समोर कितीही बालढ्य शत्रू असो, आपले स्वत्त्व, स्वाभिमान, देशाभिमान लाचाराप्रमाणे त्यांच्या चरणी वाहून टाकायचा नाही, हेच सांगणारे हे नाते आहे. आज भाजप करते आहे ती औरंगजेबाची वृत्ती आहे. नेत्यांना घाबरवायाचे. पक्ष फोडायाचे. ज्या मातीत जिजाऊ, शिवराय यांच्यासारखी दैवते जन्माला आली, त्याच मातीत खंडोजी खोपडे, सूर्याची पिसाळ, अनाजीपंत यांचे वारस जन्माला येत आहेत. देवेंद्र फडणवीस परवा जे बोलले, मी पुन्हा येईन, मी दोन पक्ष फोडून आलो. लाज वाटली पाहिजे त्यांना, दोन पक्ष फोडायची वेळ आली त्यांच्यावर. मोदी म्हणातात, मैं एकेला सब पे भारी. असे असताना त्यांना उद्धव ठाकरेंना संपवायाला कचऱ्याची गाडी का लागते, इतडून तिकडून कचरा गोळी करतात आणि मला संपवायला निघालेत. हिंमत असेल तर प्रयत्न करून बघा, गाठ माझ्या मावळ्यांशी आहे, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.

शेतीला खत लागते. खताच्या पिशवीवर कोणाचा फोटो आहे. कशावर फोटो छायपायचे कुठेही छापतात ते. सुलभ शौचालय आणि बाहेर यांचा फोटो. आतामध्ये गेल्यावर सुलभ होणार आहे का, यांचा फोटो बघा सर्व सुलभ होईल. लाखो रुपये खताच्या पिशवीवर मोदींचा फोटा छापण्यात वाया गेले. आचारसंहितेत ते झाकताही येत नाही आणि उघडेही टाकता येत नाही, असी त्यांची अडचण झाली आहे. स्वराज्य संपवण्यासाठी औरंगजेब 26 वर्षे आपल्या राज्यात आला. पण त्याला स्वराज्य संपवता आले नाही. अखेर तो या मातीत मेला. मात्र, अजूनही स्वराज्याचा भगवा डौलाने फडकतोय. मराठे तमाम दुनियेला भारी आहेत, असे औरंगजेब म्हणाला होता. येथे पराक्रम शिकवावा लागत नाही. येथे गवताला भाल्याची पाती फुटतात. मात्र, येथे दुहीचे बीज खडकावर टाकले तरी ते वाढते, फोफावते आणि सर्व राज्य संपवते, असेही तो म्हणाला होता.

फोडा, झोडा आणि राज्य करा, हेच आता भाजपवाले करत आहेत. शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, अशोक चव्हाण यांना घेतले. ते आता रोज कचरा गोळा करत आहेत. दुहीचे बीज त्यांनी टाकले आहे. त्याला मोदी खत घातले तर गद्दारी उगवेल असे त्यांना वाटते. मात्र, मराठी जनता बीजासकट खडकालाही फोडून टाकेल. दुफळी माजवणारे मोदी खत आम्हाला नको, आम्ही हक्काची लढाई लढतोय. त्यांनी ज्या पद्धतीने शिवसेना फोडली, लाज वाटायला पाहिजे. त्या काळात मोदी हटाव, असे देशभरात वातावरण असताना हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यांनी मोदींना हटवू नका, असे बाळासाहेबांनी सांगितले. जी शिवसेना त्यांच्यामागे उभी राहिली, तीच शिवसेना संपवायाला ते निघालेत.

खाल्ल्या मीठाला जागत नाही, तसेच दिल्या मताला जागत नाही, त्या गद्दाराला तुम्ही निवडून देणार का, त्याला शिवसेनेने काय दिले नव्हते. शिवसेनेमुळे जनता तुम्हाला निवडून देत होती. बुलढाणा म्हणजे त्यांचा सातबारा नाही. आता त्यांचे डिपॉझिट जप्त करून दाखवायाचे आहे. ते तुम्हाला करावेच लागेल. जिजाऊ, शिवाजी महाराज यांचे नाव घ्यायचे असेल तर या गद्दारांचा पराभव करावा लागेल.

महाराजांचे नातेवाईकही अफजलखानाला मिळाले होते. मात्र, कोन्होजी जेधे महाराजांशी एकनिष्ठ होते. त्याचा इतिहासही त्यांनी सांगितला. तशीच परिस्थिती आज पुन्हा आली आहे. भाजपात किंवा मिंधेकडे या ,नाहीतर तुरुंगा जा. आपण जे करू त्याची इतिहासात नोंद होणार आहे. इतिहासात आपली नोंद काय होईल याचा विचार करा. खंडोजी खोपडे, अनाजीपंत यांना आपण गद्दार म्हणतो. एवढ्या वर्षानंतरही त्यांचा गद्दार हा शिक्का पुसला गेला नाही. तर मिंधेंचा गद्दारीची शिक्का जायला त्यांना किती जन्म घ्यावे लागतील. मी मारले तरी चालेल पण तुमच्यासोबत येणार नाही, असे नितीन देशमुख यांनी भाजपला सांगितले. त्यांना जबरदस्तीने नेले होते. मारेन किंवा मरेन, असे ते म्हणाले. 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघाचे जीवन जगा, असे बाळासाहेब म्हणायचे. आता वाघाच्या डरकाळीने औरंगजेबासोबतच्या शेळ्या पळाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आज महाराष्ट्र लुटला जातोय, ओरबाडला जातोय,आज गुजरातवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटत आहे. मिंधे, अजित पवार फक्त बघत आहेत. त्यांना लाज वाटली पाहिजे. ते त्यांच्या चरणी लोटांगण घालत आहे. आपण असे करू शकत नाही. आपला गुजरातबाबत द्वेष नाही, त्यांच्याशी वैर नाही. तेथील जनतेने मोदींना सांगायला पाहिजे, तुम्ही गुजरात आणि देशात भिंत उभी करत आहात. गुजरात विरोधात देश असे चित्र ते निर्माण करत आहेत, हे धोकादायक आहे. जनतेनेच आता मोदींना समजवायाला पाहिजे. उद्या ते पंतप्रधान होणार नाहीच, मात्र, ते राज्या-राज्यात भांडणे निर्माण करत आहेत. गुजरात समृद्ध करा, अमचा विरोध नाही. मात्र, आमच्या हक्काचे ओरबाडू नका, असेही ते म्हणाले.

आपले इंडिया आघाडीचे सरकार येणार, त्यावेळी जे ज्या राज्याच्या हक्काचे असेल तर त्यांना मिळेल, मात्र, महाराष्ट्राच्या हक्काचे कोणालाही ओरबाडू देणार नाही. आज शेतमालाला भाव नाही, शिक्षण नाही, शिकलेल्या मुलांना नोकरी नाही, इकडे जनतेचे खायचे काय असा प्रश्न आहे आणि त्यांची घोषणा काय अबकी बार 400 पार. मात्र, असे होणार नाही. अब की बार भाजपा तडीपार, ही घोषणा गावागावात पोहचवा. आमचे हिंदुत्व राष्ट्रीयत्व आहे. हृदयात राम, हाताला काम, असे आहे. घरातील चूल पेटवणारे आहे. तर भाजपचे हिंदुत्त्व घर पेटवणारे आहे. उद्या चूक केली तर रशियासारखी आपल्या देशातही हुकूमशाही येण्याची भीती आहे. रशियात पुतिन यांनी सर्व विरोधक संपविले. काहींना तुरुंगात टाकले, काहींना संपवले. विरोधात कोणीही नाही. त्यामुळे 87 टक्के मते त्यांना मिळाली. अशी परिस्थिती आपल्या देशात येण्याची भीती आहे. आपली पुढची पिढी गुलामीत जगली पाहिजे की स्वातंत्र्यात जगली पाहिजे, हे तुम्हाला ठरवायचे आहे. त्यामुळे हुकूमशाहीचे संकट ओळखा आणि चूक करू नका. कोरोना काळात तुम्ही माझे ऐकले, त्यामुळे आपण महाराष्ट्र वाचवू शकलो. आताही भाडोत्री जनता पक्ष कितीही प्रलोभने दाखवेल, तुम्ही चूक करून नका. अब की बार भाजप तडीपार करावीच लागेल, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.