भांडूपच्या फुटपाथवर सापडले बेवारस नवजात बाळ

भांडूपमध्ये एका नवजात बाळाला फुटपाथवर बेवारस अवस्थेत सापडले आहे. भूकेने हे तान्हुले रडत होते. एका पादचाऱ्याने बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि त्या दिशेने गेले असता त्यांना हे बाळ दिसले. त्यांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. सध्या पोलीस बाळाच्या आईचा कसून शोध घेत आहेत.

भांडुप पश्चिम येथील मेट्रो मॉलच्या पाठीमागे असलेल्या चार्मिंग बिल्डींग नंबर 6 जवळील रस्त्यालगत ही नवजात मुलगी सापडली आहे. तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीने तिच्य़ा रडण्य़ाचा आवाज ऐकला आणि तिथे गेला असता त्याला ते बाळ दिसले. बाळाच्या अंगावर कपडे नव्हते. तिला तसेच एका कपड्यावर ठेवले होते. शेजारी एक पांढऱ्या रंगाची पिशवी आणि बाजुला डायपरची पिशवीही दिसत आहे. त्या पादचाऱ्याने तिथल्या पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी ते बाळ ताब्यात घेतले असून ते बाळ तिथे कोणी सोडले, तिचे आई-वडिल कोण याचा शोध घेत आहेत.