संभाजी भिडे गुरुजी यांच्याविरोधात अमरावतीमध्ये गुन्हा दाखल

‘गांधीजींचे वडील हे मुसलमान जमीनदार होते’ असे विधान करणाऱ्या संभाजी भिडे गुरुजी यांच्याविरोधात अमरावतीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजापेठ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रपित्याबद्दल निंदाजनक विधाने केल्यानंतर विविध सामाजिक संघटना आणि काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. काँग्रेसने संभाजी भिडे गुरुजी यांना तत्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे.

सतत वादग्रस्त वक्तव्ये करणारे संभाजी भिडे गुरुजी यांनी यावेळी थेट राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वडिलांबाबतच विधान करून पुन्हा वाद निर्माण केला आहे. भिडे गुरुजी हे शनिवारी यवतमाळमध्ये आले होते. यावेळी त्यांना विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. या विरोध करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भिडे गुरुजींना विरोध करणाऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवण्याचाही प्रयत्न झाला. गांधीजींचे वडील हे मुसलमान जमीनदार होते असे भिडे यांनी म्हटल्याने काँग्रेस नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. विधानसभेत तर भिडे यांच्या अटकेची मागणी काँग्रेसने लावून धरली होती.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक असलेले संभाजी भिडे यांनी अमरावतीमधील बडनेरा मार्गावरील जय भारत मंगलम येथे आयोजित सभेमध्ये महात्मा गांधींबद्दल हे विधान केले. मोहनदास म्हणजेच गांधीजी हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुसलमान जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे संतापलेल्या त्या जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले आणि त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे गांधीजींचे खरे वडील नसून ते त्या मुसलमान जमीनदाराचे पुत्र आहेत. गांधीजींचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुसलमान पालकाने केले असल्याचे सबळ पुरावे उपलब्ध असल्याचा दावाही यावेळी भिडे यांनी केला.

या वक्तव्यावरून अधिवेशनात गदारोळ झाला. यावरून प्रचंड आक्रमक होत काँग्रेसच्या सदस्यांनी भिडेंच्या अटकेची मागणी केली. काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला होता. समाजात तेढ निर्माण करणाऱया भिडे यांना अटक करून त्यांच्यावर कलम 153 अन्वये तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेसच्या यशोमती ठाकूरही या मुद्दय़ावर आक्रमक झाल्या होत्या.