पीएफआयच्या नावाने खोटे अर्ज करणाऱ्या एकाला अटक; दुसऱ्या भावाचा शोध सुरू

पीएफआय या दहशतवादी संघटनेचे सदस्य हिंदुस्थानात दंगली घडवण्याचा डाव रचत आहेत. हिंदू-मुस्लिम समाजात दंगली घडवण्याचा मोठा कट रचत असून मंदिर, मस्जिद, चर्च हे त्यांचे टार्गेट आहेत, असे घबराट पसरविणारे तक्रार अर्ज राज्यपालांपासून शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना पाठवून खोडसाळपणा करणाऱया एकाला भोईवाडा पोलिसांनी अखेर अटक केली. पोलीस आरोपीच्या दुसऱया भावाचा शोध आहेत.

पीएफआयचे सदस्य हे जम्मू-कश्मीर येथून प्रशिक्षण घेऊन मुंबईत घातपात घडवण्यासाठी आले आहेत. ते मुंबई शहर आणि उपनगरात दंगली घडवणार आहेत. हिंदू-मुस्लिम समाजात दंगली घडवण्याबाबत बैठका झाल्या आहेत असे खोटे तक्रार अर्ज राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह शहरातील पोलीस ठाण्यांना पाठविण्यात येत होते. भोईवाडा पोलिसांनी त्यांच्याकडे आलेल्या अशा तक्रार अर्जाचा सखोल तपास केला. तो अर्ज चेंबूर येथील पोस्टात देण्यात आला होता. त्यामुळे तेथील सीसीटीव्ही तपासून व चौकशी केल्यावर एक अल्पवयीन मुलाने ते अर्ज पोस्टात आणून दिल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी त्या मुलाला शोधून त्याच्याकडे चौकशी केली. तेव्हा त्याला एक व्यक्ती ते अर्ज पोस्टात देण्यासाठी सांगत असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर उठसूट तक्रार अर्ज करणाऱया मोहम्मद अफसर आझाद रहिम तुला खान या आरोपीला अथक परिश्रमानंतर भोईवाडा पोलिसांनी शोधून त्याला अटक केली. आता पोलीस त्याचा भाऊ मोहम्मद अख्तर आझाद याचा पोलीस शोध घेत आहेत. हे दोघे भाऊ ज्याला त्रास द्यायचा आहे अशाच्या नावाने खोटे तक्रार अर्ज पाठवत होते.

दिशाभूल करण्यासाठी वेगवेगळय़ा लोकांचा वापर
अफसर आणि अख्तर हे दोघे भाऊ डोकेबाज आहेत. पोलिसांना छळण्यासाठी तसेच कोणालाही त्रास देण्यासाठी ते दोघे दहशतवादी कृत्य करण्यासाठी सतत अर्जांचा मारा करत होते. विशेष म्हणजे आपण पिक्चरमध्ये येऊ नये तसेच पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ते वेगवेगळय़ा लोकांकरवी तक्रार अर्ज पोस्टात पाठवायचे. त्या लोकांना अर्ज पोस्टात देण्याच्या मोबदल्यात पैसे मोजायचे.