सलमानच्या घरावर गोळीबार करणारे गुजरातमध्ये सापडले

अभिनेता सलमान खान याच्या बॅण्डस्टॅण्ड येथील घरावर बेछूट गोळीबार करून पळालेले बिश्नोई गँगचे दोघे शूटर अखेर सापडले. गोळीबार केल्यानंतर गुजरात गाठून ते भुज जिह्यातील एका मंदिरात लपले होते. हा गोळीबार करून बिश्नोई गँगने मुंबई पोलिसांना आव्हान दिले होते; पण मुंबई गुन्हे शाखेनेदेखील लौकिकाला साजेशी कामगिरी करत त्या दोघांना पकडलेच. विकी गुप्ता (24) आणि सागर पाल (21) अशी त्यांची नावे आहेत.

बॅण्डस्टॅण्ड येथील सलमान खान राहत असलेल्या गॅलेक्सी इमारतीमधील घरावर 14 एप्रिलच्या पहाटे 4.55 मिनिटाला दुचाकीवरून आलेल्या शूटरने पाच गोळय़ा झाडल्या आणि हल्लखोर पळून गेले. एक गोळी घरात गेली तर दुसरी गोळी भिंतीत घुसली. अन्य तीन गोळय़ा इतरत्र गेल्या. वांद्रे पोलिसांकडून पुढील कारवाईसाठी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष आयुक्त देवेन भारती यांच्या सूचनेनुसार सहआयुक्त लखमी गौतम यांच्या थेट देखरेखीखाली व उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या नेतृत्वाखाली 12 पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू झाला. एसीपी महेश देसाई, वरिष्ठ निरीक्षक दया नायक व पथकाने आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली.

गोळीबार केल्यानंतर आरोपींनी मत माऊली परिसरात गुह्यातली दुचाकी सोडली. तिकडून रिक्षाने ते वांद्रे रेल्वे स्थानकात गेले. तेथे बोरिवली लोकलने ते सांताक्रुझ स्थानकात उतरले. तिकडून वाकोला येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावर गेले. तेथून टॅक्सीने ते मिरारोडला गेले. तिथे टॅक्सी सोडली आणि बसने त्यांनी सुरत गाठले. त्यापुढे सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत ते भुजला पोहचले. भुजपासून 60 किमीवर मातानुमड मंदिरात त्यांनी आश्रय घेतला होता. तिथेच त्यांना सोमवारी रात्री उशिरा भुज पोलिसांच्या मदतीने पकडण्यात आले.

रेकी, भाडय़ाने घर, दुचाकीची खरेदी अन्…

28 फेब्रुवारीला विकी आणि सागर मुंबईत आले. मुंबई सेन्ट्रल स्थानकात उतरल्यानंतर दुसऱया दिवशी त्यांनी बॅण्ड स्टॅण्ड येथे रेकी केली. त्यानंतर 2 व 5 मार्च रोजी दोघांनी पुन्हा जाऊन रेकी केली होती. त्यानंतर 10 मार्च रोजी त्यांनी पनवेलच्या माथेरान मार्गावर असलेल्या हरिग्राम गावात एक घर भाडय़ाने घेतले. तेथून सलमान खानचा फार्महाऊसदेखील जवळपास आहे. 10 हजार आगाऊ रक्कम आणि तीन हजार भाडय़ाने त्यांनी घर घेतले. थोडे दिवस राहून दोघे पुन्हा गावी गेले. गावी होळी खेळून ते पुन्हा 1 एप्रिलला पनवेलला परतले. 2 एप्रिलला त्यांनी पनवेलमध्ये 24 हजारांत एक वापरती दुचाकी खरेदी केली. मग 14 एप्रिलचा दिवस निवडून आरोपींनी गोळीबार केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.