पोलिसांच्या 139 जागांसाठी तब्बल 12 हजारांवर अर्ज, पोलीस भरतीसाठी नगरमध्ये सोमवारपासून मैदानी चाचण्या

पोलीस भरतीच्या नगर जिह्यातील 139 जागेसाठी 12 हजार 334 अर्ज दाखल झाले आहेत. आता प्रत्यक्षात मैदानी चाचणीला 2 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. 2 जानेवारी ते 14 जानेवारीदरम्यान येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर चाचणी घेण्यात येणार असून, त्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून तयारी पूर्ण झाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक (श्रीरामपूर) स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली 386 पोलीस अधिकारी-अंमलदारांचा बंदोबस्त भरती प्रक्रियेसाठी असणार आहे.

नगर जिह्यात पोलीस शिपाईपदाच्या 129 जागांसाठी 11 हजार 188 तर चालकाच्या 10 जागांसाठी एक हजार 146 अर्ज दाखल झाले आहेत. गेल्या सहा ते सात वर्षांनंतरची एवढय़ा मोठय़ा प्रमाणातील ही पहिलीच भरती असल्याने मुलांनी जोरदार तयारी केली आहे. अनेक ठिकाणी मुलांच्या सरावांनी मैदाने गजबजली आहेत. जिल्हा पोलिसांकडूनही मैदानी चाचणीसाठी तयारी पूर्ण करण्यात आली आहे. अत्यंत पारदर्शक पद्धतीने ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, तसे नियोजन करण्यात आले आहे.

उमेदवारांना चाचणीसाठी पहाटे पाच वाजता हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एका दिवशी एक हजार उमेदवारांना बोलविण्यात आले आहे. 2 व 3 जानेवारीला चालकपदाच्या 10 जागांसाठीच्या उमेदवारांची चाचणी घेण्यात येणार आहे. यानंतर 4 ते 14 जानेवारीदरम्यान पोलीस शिपाईपदाच्या 129 जागांसाठी मैदानी चाचणी पार पडणार आहे. पहाटे पाच ते सकाळी 11 वाजेपर्यंत दररोज या चाचण्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

मैदानी चाचणीवर सीसीटीव्हींची नजर

संपूर्ण भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर अधीक्षक प्रशांत खैरे, अपर अधीक्षक (श्रीरामपूर) स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक 5, पोलीस निरीक्षक 20, सहायक पोलीस निरीक्षक 11, पोलीस उपनिरीक्षक 26, पोलीस अंमलदार 236, महिला पोलीस अंमलदार 88 असा बंदोबस्त असणार आहे. संपूर्ण मैदानी चाचणीवर सीसीटीव्हींचा वॉच असणार आहे. मैदानी चाचणी ठिकाणी कोणताही गैरप्रकार होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. त्यासाठी लाचलुचपत विभागाचे एक पथकही असणार आहे.

पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर होणार चाचणी

नगरमधील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर तयारी करण्यात आली आहे. कागदपत्रांची तपासणी, छाती, उंचीची मोजणी, गोळाफेक व 100 मीटर धावणे हे येथील मैदानात होणार आहे. तर मुलींसाठी 800 मीटर व मुलांसाठी 1600 मीटर धावण्यासाठी अरणगाव शिवारात व्यवस्था करण्यात आली आहे.