पंतप्रधान मोदींनी घेतली ‘इस्त्रो’च्या वैज्ञानिकांची भेट, संवाद साधताना अश्रू अनावर झाले

दोन देशांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी मायदेशी परतले. मायदेशी येताच मोदींनी दिल्ली न गाठता ते थेट बंगळुरूला पोहोचले. येथे त्यांनी ‘इस्त्रो’च्या वैज्ञानिकांची भेट घेतली. पंतप्रधानांनी ‘चांद्रयान-3’ मोहिमेच्या यशाबद्दल वैज्ञानिकांचे अभिनंदन केले. या भेटीनंतर संवाद साधताना मोदी भावूकही झाले.

‘चांद्रयान-3’ बुधवारी 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. या ऐतिहासिक क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स परिषदेसाठी दक्षिण आफ्रिकेमध्ये होते. त्यांनी तिथून ‘इस्त्रो’च्या वैज्ञानिकांच्या यशाचा सोहळा व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून लाईव्ह पाहिला होता आणि त्यांनी वैज्ञानिकांचे कौतुकही केले. आता मोदी मायदेशी परतले असून त्यांनी तात्काळ ‘इस्त्रो’च्या वैज्ञानिकांची भेट घेत त्यांचे कौतुक केले.

तुम्हा सगळ्यांना भेटून एक वेगळाच आनंद होत आहे. असा आनंद खूप कमी वेळा होतो. शरीर आणि मन आनंदाने भरून गेले आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. यावेळी ते भावूकही झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले. आज मला एका वेगळ्याच आनंदाची अनुभूती येत असून असे प्रसंग खूप दुर्मीळ आहेत. चांद्रयान-3च्या लँडिंगच्या वेळी मी खूप अस्वस्थ होतो. त्यावेळी मी दक्षिण आफ्रिकेत होतो, पण माझे मन तुम्हा सर्वांसोबत होते, असे मोदी ‘इस्त्रो’च्या वैज्ञानिकांना म्हणाले.