प्रियांका गांधी 2024ची लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता, रॉबर्ट वाड्रा यांनी दिले संकेत

गांधी घराण्याचा आणखी एक सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी 2024मध्ये होणारी लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. प्रियांका यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

मला असे वाटते की प्रियांका गांधी संसदेत असावी. लोकसभेत नक्कीच असावी. तिच्यात सर्व गुण आहेत. संसदेमध्ये ती उत्तम कामगिरी करेल. लोकसभेत जाण्यासाठी ती पात्र आहे. तसे झाले तर मला आनंदच होईल. मला आशा आहे की काँग्रेस त्यांचा स्वीकार करेल आणि तिच्यासाठी नक्कीच चांगली योजना आखेल, असे रॉबर्ट वाड्रा म्हणाले.

भाजपवर निशाणा

संसदेमध्ये आपला फोटो दाखवण्यावरही त्यांनी भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही गौतम अदाणी यांच्यासोबत विमानातून प्रवास करतानाचा फोटो आहे. याचे आधी उत्तर द्या. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही संसदेत हा प्रश्न उपस्थित केला. मात्र याचे उत्तर मिळाले नाही, असा टोला रॉबर्ट वाड्रा यांनी लगावला.