पुण्यात मोबाईल चोरणारी परप्रांतीय टोळी गजाआड, 16 लाखांचे तब्बल 52 मोबाईल जप्त

पुणे शहर परिसरात मोबाईल चोरणाऱ्या परप्रांतीय टोळीला हडपसर पोलिसांच्या पथकाने अटक केली. आरोपींकडून १६ लाख रुपये किंमतीचे तब्बल 52 मोबाईल जप्त करण्यात आले. आरोपींनी हे मोबाईल हडपसर, फरासखाना, विश्रामबाग, बंडगार्डनसह शहराच्या इतर भागातून चोरी केले आहेत.

शामकुमार संजय राम (वय 25 वर्षे रा.सायबगंज, झारखंड), विशालकुमार गंगा महातो (वय २१ वर्षे रा. झारखंड), बादलकुमार मोतीलाल महातो (वय 25 वर्षे रा. झारखंड), विकीकुमार गंगा महातो ऊर्फ बादशाह नोनीया (वय 19 वर्ष रा, झारखंड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पुण्यात गणेशोत्सव पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. शहरासह उपनगरात देखील गर्दीचे प्रमाण मोठे आहे. याच गर्दीचा गैरफायदा घेत काही चोरटे सक्रिय होतात. विशेषतः गणेशोत्सवाच्या कालावधीत मोबाईल चोरट्यांचे प्रमाण वाढते. या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांनी परिसरात गस्त वाढविली आहे. हडपसर पोलीस ठाण्यांच्या हदीत गाडीतळ, भाजी मंडई परिसरात लोकांची सामान खरेदीसाठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पथक हद्दीत गस्तीवर होते. या दरम्यान उन्नती नगर कॅनॉल परिसरात संशयित मोबाईल चोर थांबल्याची माहिती अंमलदार अजित मदने, कुंडलीक केसकर यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपी शामकुमार, विशालकुमार, बादलकुमार यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चोरीचे 12 मोबाईल मिळून आले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी पूर्व नियोजीत कट करून मोबाईल चोरीचे गुन्हे केल्याचे समोर आले. आरोपी झारखंड येथून पुण्यात येऊन चोरी करत होते. त्यांच्याकडून पोलिसांनी 16 लाख रुपये किंमतीचे एकूण 52 मोबाईल जप्त केले.

परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, गुन्हे निरीक्षक विश्वास डगळे, संदीप शिवले, सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, उपनिरीक्षक अविनाश शिंदे, अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, सचिन गोरखे, अजित मदने, कुंडलीक केसकर यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.