मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो…; IPL मधील ‘या’ खेळाडूने KKR च्या प्रशिक्षकावर केले गंभीर आरोप

आयपीएलमध्ये खेळण्यासाठी दरवर्षी नवनवीन खेळाडूंना संधी दिली जाते. यामध्ये असे अनेक खेळाडू असतात जे केवळ काही सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी करतात. या हंगामातही असा एक खेळाडू आहे जो पंजाब किंग्समध्ये खेळत आहे. आशुतोष शर्मा असे त्या खेळाडूचे नाव असून त्याने पंजाबला एका सामन्यात विजय मिळवून दिला आहे. परंतु आता आशुतोषने कोलकाता नाईट रायडर्सचे सध्याचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्याबाबत एक मोठा खुलासा केला आहे.

आशुतोष शर्मा यापूर्वीचे टी20 सामने मध्य प्रदेशकडून खेळायचा. यावेळीही त्याने संघासाठी उत्तम कामगिरी केली. परंतु आशुतोष शर्माला देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपला संघ बदलावा लागला होता. सुमारे 3 वर्षांपूर्वी त्याला मध्य प्रदेशचा संघ सोडून रेल्वेच्या संघात खेळण्यासाठी संघाचे प्रशिक्षक यांनी भाग पाडले होते, असे त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो रेल्वेच्या संघातून खेळतो.

आशुतोषने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले की, ‘2019 च्या सत्रातील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या शेवटच्या T20 सामन्यात त्याने 84 धावांची इनिंग खेळली होती. या हंगामानंतर संघात मोठे बदल झाले आणि एका व्यावसायिक प्रशिक्षकाने मध्य प्रदेशची जबाबदारी स्वीकारली. त्या प्रशिक्षकाच्या काही वैयक्तिक आवडी-निवडी होत्या. नवीन हंगामापूर्वी त्याने निवड सामन्यात उत्तम कामगिरी केली होती. परंतु नवीन संघात त्याचे नाव नव्हते. त्यावेळी कोरोनाचे सावट आले होते. खेळाडूंना हॉटेलमध्ये राहावे लागत होते. त्यामुळे मीही संघासोबत हॉटेल्समध्ये राहायचो, जिममध्ये ट्रेनिंग घ्यायचो. पण खेळण्याची संधी शेवटपर्यंत मिळाली नाही. त्यामुळे मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो. म्हणूनच मी संघ सोडून रेल्वे संघात गेलो.’

2019 च्या हंगामानंतर प्रसिद्ध प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी मध्य प्रदेशची जबाबदारी स्वीकारली होती. परंतु मुलाखतीत आशुतोषने एकदाही त्यांचे नाव घेतले नाही. चंद्रकांत पंडित हे कठोर वृत्ती आणि शिस्तीसाठी ओळखले जातात. ज्यामुळे अनेक खेळाडूंची कामगिरी सुधारली. त्यांच्या प्रशिक्षणातच मध्य प्रदेशने प्रथमच रणजी करंडक जिंकला.