हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेविषयी बढाया मारणं धोकादायक, रघुराम राजन यांचा इशारा

Raghuram Rajan on Indian economy – 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेविषयी जुमलेबाजी करण्यात गर्क आहेत. त्यांनी हिंदुस्थान हा येत्या काळात जगातली तिसरी सर्वाधिक मोठी अर्थव्यवस्था होईल असा दावा केला आहे. पण, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि अर्थतज्ज्ञ डॉ. रघुराम राजन यांनी या बढाया मारणं धोकादायक असल्याचं म्हटलं आहे.

ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत रघुराम राजन यांनी हा इशारा दिला आहे. हिंदुस्थानच्या आर्थिक प्रगतीला ज्या प्रकारे वाढवून सांगितलं जात आहे, त्यावर विश्वास ठेवणं ही हिंदुस्थानची सगळ्यात मोठी चूक ठरेल. आपली अर्थव्यवस्था पूर्ण क्षमतेने विकसित करण्यासाठी हिंदुस्थआनला अनेक प्रकारच्या संरचनात्मक समस्यांना आधी सोडवावं लागेल. कारण, ज्या प्रकारे हे सगळं फुगवून सांगितलं जात आहे, त्याला सिद्ध करण्यासाठी पुढची अनेक वर्षं आपल्याला मेहनत करावी लागेल, असं डॉ. राजन म्हणाले आहेत.

लोकसभा निवडणुकीत जे सरकार निवडून येईल, त्या सरकारसमोर सगळ्यात मोठं आव्हान शिक्षण व्यवस्था आणि कार्यबलात कौशल्य विकासाच्या सुधारणा करणं हेच असणार आहे. या त्रुटी दूर केल्याशिवाय हिंदुस्थानला आपल्या तरुणांच्या क्रयशक्तीचा सुयोग्य लाभ घेता येणार नाही. उलट, क्रयशक्ती असूनही त्यात अनेक समस्यांना सामोरं जावं लागेल, असाही इशारा रघुराम राजन यांनी या मुलाखतीदरम्यान दिला.

2047पर्यंत हिंदुस्थानला विकसित देश बनवण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या दाव्यालाही राजन यांनी खोडून काढलं. जर तुमच्या देशातील मुलांकडे शालेय शिक्षण नाही आणि शाळा सोडण्याचा टक्का जास्त असेल तर अशा परिस्थितीत हे लक्ष्य साध्य करण्याविषयी बोलणं निरर्थक आहे, असंही राजन यावेळी म्हणाले.