अभिप्राय – जागतिक अभिजात साहित्यकृतींचा परिचय

>>राहुल गोखले


‘विश्वसाहित्यातील अक्षरलेणी’ हे डॉ. प्रल्हाद कुलकर्णी यांचे पुस्तक वाचकांना जागतिक स्तरावर अभिजात म्हणून गणल्या जाणाऱया निवडक साहित्यकृतींची ओळख करून देते. अभिजात याचा अर्थ सर्वोत्तम गुणवत्ता आणि ज्याला कालातीत मूल्य आहे असा होतो. प्रस्तुत पुस्तकात ज्या साहित्यकृती लेखकाने निवडल्या आहेत, त्यावरून याची प्रचीती येईल. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीच्या ‘बॅकी’ या युरिपिडीसने लिहिलेल्या ग्रीक शोकांतिकेपासून अगदी अलीकडच्या म्हणजे 2017 साली मॅन बुकर पारितोषिकासाठी निवड झालेल्या एमिली फ्रिडलंड यांच्या ‘हिस्ट्री ऑफ वुल्व्हस्’ या कादंबरीपर्यंत तेवीस साहित्यकृतींचा परिचय पुस्तकात अंतर्भूत आहे. यावरूनच कालखंडाच्या बाबतीतील विस्तीर्णता लक्षात येईल. मात्र त्याबरोबरच या निवडीतील आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्यातील वैविध्यता.

म्हणजे रिअलिझम हा साहित्यात प्रवाह म्हणून प्रस्थापित करण्यात मोलाचे योगदान असणाऱया फ्रँझ काफ्काच्या ‘दि ट्रायल’ या कादंबरीचा परिचय लेखकाने करून दिला आहे. तेथेच अब्सर्डिटी हा प्रवाह साहित्यात ठसठशीतपणे आणणाऱया कामूच्या ‘दि स्ट्रेन्जर’ या कादंबरीचाही परिचय पुस्तकात आहे. कामू हा फ्रान्समध्ये जन्मलेला नोबेल पारितोषिक विजेता लेखक, तर काफ्का प्रागमध्ये जन्माला आलेला जर्मन साहित्यिक. मूळचे लेखक युरोप-अमेरिका येथीलच प्रामुख्याने असले तरी जपानमधील यौशिमोटो यांच्या ‘मोशी मोशी’ या कादंबरीचा, क़ाफूची ‘गेशा इन रायव्हलरी’, जुनिचिरो तनिझाकीची ‘दि माकिओका सिस्टर्स’ या साहित्यकृतींचा परिचयदेखील लेखकाने अंतर्भूत केला असल्याने या संकलनाला खऱया अर्थाने जागतिक परिप्रेक्ष्य निर्माण झाले आहे.

शिवाय कादंबऱयांबरोबरच नाटके, कथासंग्रह यांचाही त्यात समावेश आहे. समाजातील ढोंगीपणा, दांभिकपणा यावर भाष्य करणारे फ्रेंच नाटककार मोलीएरचे ‘मिसॅनथ्रॉपी’, सतराव्या शतकातील लेखक विल्यम विचर्लीचे ‘दि कंट्री वाइफ’ या नाटकांचा परिचय लेखकाने करून दिला आहे. श्रद्धा, शंका, बुद्धिवाद यांचा ऊहापोह करणाऱया ‘दि ब्रदर्स कार्मोझाव्ह’ या डोस्टोव्हस्कीच्या कादंबरीचा परिचय करून देताना लेखकाने हा महान साहित्यिक या कादंबरीचे लेखन जवळपास दोन वर्षे करीत होता अशी माहिती देतो. मोपासाँ या लेखकाला प्रचंड प्रसिद्धी ज्या कथेने मिळवून दिली त्या मूळच्या कथेचे इंग्रजीत रूपांतर झालेल्या ‘बॉल-अँट-फॅट’ या कथेचा परिचय लेखकाने करून दिला आहे. जॉर्ज बर्नार्ड शॉचे ‘दि पिग्मॅलिय’, जोसेफ कॉनरॅडची ‘हार्ट ऑफ डार्कनेस’, विलियम फॉकनरची ‘अॅज आय ले डाईंग’, आर्थर मिलरचे ‘डेथ ऑफ ए सेल्समन’ हे नाटक… त्यांचा परिचय करून देणाऱया लेखांचा समावेश पुस्तकात करून देण्यात आला आहे.

या पुस्तकाचा आणखी एक विशेष म्हणजे साहित्यकृतीचा परिचय करून देताना लेखकाने त्या-त्या साहित्यिकाबद्दल धावत्या स्वरूपात माहिती पुरविली आहे. त्यामुळे साहित्यिकाची जडणघडण आणि त्याने निर्माण केलेली साहित्यकृती यांचा संबंध तपासण्याची संधी वाचकांना मिळेल.

विश्वसाहित्यातील अक्षरलेणी
लेखक: डॉ. प्रल्हाद कुलकर्णी
प्रकाशक : अक्षरदीप प्रकाशन, कोल्हापूर
पृष्ठे : 144 मूल्य : 250/- रुपये