चीनमध्ये विचित्र न्यूमोनियाचे संकंट; केंद्र सरकार अलर्ट, मार्गदर्शक तत्त्वे जारी

चीनमध्ये पसरत असलेल्या न्यूमोनियासारख्या गूढ आजाराच्या पार्श्वभूमीवर जगभरात चिंता पसरली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही याची दखल घेतली आहे. तसेच यावर लक्ष ठेवण्याचे आणि साथ आटोक्यात आणण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या गूढ आजारामुळे कोरोनासारखी मोठी महामारी निर्माण होण्याचा धोका असल्याने जगभरातील चिंता वाढली आहे. विशेष करून लहान मुलांमध्ये न्यूमोनियासारखा आजार पसरत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने चीनमध्ये पसरत असलेल्या या आजाराबाबत मार्गदर्शक तत्वे जारी करत राज्यांना सावधानतेच्या सूचना दिल्या आहेत.

चीनमध्ये या गंभीर आजाराचा प्रकोप वाढत असून तेथील शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर देशातही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोनासदृश मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र,याबाबत घाबरण्याची गरज नसून सावधगिरी म्हणून या नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच देशात सध्या अलर्टसारखी परिस्थिती नसल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे.

आरोग्य मंत्रालयाने या संबंधीत एक निवेदन जारी केले आहे. त्यानुसार श्वसनासंबंधीत या आजार इन्फ्लूएंजा, मायकोप्लाज्मा न्यूमोनिया, SARS-CoV-2 सारख्या कारणांमुळे होत आहे. आरोग्य मंत्रालय या आजाराच्या स्थितीवर बारकाईने लक्ष देऊन आहे. सध्या काळजी करण्याची आवश्यकता नाही असेही सांगण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 26 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चीनमध्ये पसरणाऱ्या नवीन श्वसनाच्या आजाराचा रोगाचा धोका लक्षात घेता आम्ही देशाच्या सर्व भागांवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. मात्र, कोविड काळाप्रमाणे आरोग्यविषयक नियमांचे पालन केले पाहिजे असे सरकारने म्हटले आहे.

आरोग्य मंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना तत्काळ सार्वजनिक आरोग्य आणि रुग्णालयाची स्थितीचा आढवा घेण्यास सांगितले आहे. यासोबतच मानवी संसाधने, रुग्णालयातील बेड, अत्यावश्यक औषधे, वैद्यकीय ऑक्सिजन, पीपीई, चाचणी किट इत्यादींची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या आवश्यकतेवर या निर्देशात भर देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, आरोग्य सेवा सुविधांनी त्यांचे ऑक्सिजन प्लांट आणि व्हेंटिलेटरची उपलब्धता आणि संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी संक्रमण नियंत्रण प्रोटोकॉलचे काळजीपूर्वक पुनरावलोकन केले पाहिजे, असे आरोग्यमंत्र्यांनी आपल्या निर्देशात म्हटले आहे.

आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्र शाषित प्रदेशांना आजाराचा सामना करण्यासाठी रुग्णालयाच्या तयारीचा आढावा घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. राज्यांनी कोरोना काळात लागू करण्यात आलेल्या गाईडलाइन्सचे पालन करावे, जिल्हा आणि राज्यात सर्व आरोग्य केंद्रावर लक्ष ठेवलं जाईल. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत असेही सांगण्यात आले आहे.