मुंबईत 74 ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका; 46 ठिकाणे अतिधोकादायक, हजारो रहिवाशांचा जीव टांगणीला

इर्शाळवाडीवर दरड कोसळल्यामुळे 26 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यातील दरडीखाली राहणाऱ्या रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना एकटय़ा मुंबईत  74 दरडप्रवण ठिकाणे धोकादायक असल्याचे समोर आले आहे. भारतीय भौगोलिक सर्वेक्षण विभागाच्या सहाय्यातून हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या दरडींच्या ठिकाणी प्रशासनाकडून सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जात असल्या तरी धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या हजारो रहिवाशांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून दरडी कोसळण्याची संभाव्य ठिकाणे असलेल्या विभागातून माहिती एकत्र करून 2017 मध्ये पालिकेच्या कार्यक्षेत्रातील एकूण 299 ठिकाणांचे शास्त्रीय पद्धतीने सर्वेक्षण करण्यात आले. यासाठी भारतीय भौगोलिक सर्वेक्षण विभागाची मदत घेण्यात आली. 2018 मध्ये भारतीय सर्वेक्षण विभागाने 299 पैकी 249 संभाव्य दरडी कोसळण्याच्या ठिकाणांचे सखोल सर्वेक्षण करून त्याचे चार उपप्रकारांत विभाजन केले. यामध्ये 46 ठिकाणे अतिधोकादायक, 28 ठिकाणे मध्यम धोकादायक, 40 ठिकाणे कमी धोकादायक व 135 ठिकाणे धोका नसल्याचे निश्चित करण्यात आले असल्याची माहिती आमदार  अभिजित वंजारी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांच्या वतीने सरकारकडून लेखी उत्तरात देण्यात आली आहे.

अशी आहे पालिकेची तयारी

मुंबईत 24 तासांत 200 किंवा 250 मिमी पाऊस झाल्यास सुरक्षेच्या दृष्टीने दरडी कोसळणाऱ्या संभाव्य ठिकाणांच्या रहिवाशांचे स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय आपत्कालीन विभागाकडून आपत्कालीन स्थितीत काय करावे, काय करू नये, प्रथमोपचार, जखमींना वाहून नेण्याची पद्धती याबाबत प्रशिक्षण देण्यात येते. अशी घटना घडल्यास पालिकेच्या अग्निशमन दलाच्या सहाय्याकरिता अंधेरी क्रीडा संकुल येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या तीन तुकडय़ा व पूर्व उपनगरांसाठी विक्रोळी व कांजुरमार्ग या ठिकाणी दोन जादा तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत.

सुरक्षेच्या या उपाययोजना आवश्यक

दरडी कोसळण्याची शक्यता असणाऱ्या संभाव्य ठिकाणी संरक्षक भिंती बांधण्यासोबत सांडपाणी सुविधा, वेळोवेळी धोकादायक झाडांच्या फांद्या छाटणे, नाल्यांच्या भिंतींची डागडुजी, नवीन झाडांची लागवड, नागरिकांचे मान्सून कालावधीत तात्पुरते स्थलांतर, स्थानिक नागरिकांकरिता जनजागृती व प्रशिक्षण अशा उपाययोजना भारतीय भौगोलिक सर्वेक्षण विभाग आणि भूस्खलन तांत्रिक समितीकडून सुचविण्यात आल्या आहेत.