रोखठोक – मोदी भक्त खोटे का बोलतात?

पंतप्रधान मोदी यांना खोटे बोलण्याची नशा चढली आहे. मोदी खोटे बोलतात व त्यांचे अंधभक्त खोटेपणावर टाळय़ा वाजवतात. युक्रेनरशियाचे युद्ध मोदींमुळे थांबले, असे अंधभक्त सांगत होते. दोन वर्षांनंतरही हे युद्ध सुरूच आहे. गुजरातच्या किनाऱ्यावर रोज कोट्यवधींचे ड्रग्ज उतरवले जातेय. ही त्याचीच नशा आहे काय?

जगात कोठे ना कोठे युद्ध हे सुरूच आहे. रशिया-युक्रेन युद्धास दोन वर्षे झाली. युद्ध संपलेले नाही. पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष पुतीन व युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात मध्यस्थी करून युद्ध थांबवल्याच्या पुडय़ा हिंदुस्थानातील मोदी भक्तांनी सोडल्या. युद्ध शिगेला पोहोचले असताना युक्रेनच्या अध्यक्षांनी मोदींना फोन करून युद्ध थांबविण्यासाठी पुतीन यांना गळ घालण्याची हात जोडून विनंती केली व त्यानुसार मोदी यांनी पुतीन यांना युद्ध थांबविण्यास सांगितले, अशी फेकुगिरी या काळात झाली. प्रत्यक्षात पुतीन अधिकच बेफाम झाले. युद्ध सुरूच राहिले. युक्रेनचे 50,000 सैनिक युद्धात मारले गेले. मोदी यांनी थांबवलेल्या युद्धाचा हा परिणाम आहे. जगातील कोणतेही युद्ध थांबवणे हे मोदींच्या हातात नाही. मोदींच्या शौर्याचा त्यांचे भक्त ढोल पिटतात. ते सर्व खोटे आहे. पहिले महायुद्ध हे युद्ध संपविण्यासाठीचे युद्ध असे सांगितले गेले. प्रत्यक्षात तसे ते ठरले नाही. दुसरे महायुद्ध हे शेवटचे युद्ध अशी ग्वाही दिली गेली. तीही खरी ठरली नाही. अनेक देशांत अंतर्गत यादवीने उग्र स्वरूप धारण केले आहे. त्यात आतापर्यंत दोन कोटी लोक मेले. गुजरात व शीख दंगलींचाही त्यात समावेश आहे. हिंदुस्थान स्वत: अंतर्गत यादवीच्या उंबरठय़ावर आहे.

हिमाचलचा खेळ

हिमाचल प्रदेशात राज्यसभेची निवडणूक पार पडली. तेथे काँग्रेसचे राज्य आहे. 40 चे बहुमत आहे. भारतीय जनता पक्षाकडे 25 आमदार असतानाही त्यांनी राज्यसभेसाठी उमेदवार उभा केला. याचा संदेश स्पष्ट होता. आम्ही काँग्रेसचे आमदार विकत घेऊ किंवा पळवू, पण राज्यसभेत जिंकून दाखवू. हिमाचल प्रदेशात काँग्रेसकडून अभिषेक मनु सिंघवी हे उमेदवार होते. त्यांचा विजय सहज होता. भाजपकडे जिंकण्यासाठी संख्याबळ नव्हते, पण काँग्रेसचे सहा आमदार पोलीस बळाचा वापर करून उचलले व ओलीस ठेवले. सिंघवी यांचा पराभव त्यातून झाला. चंदिगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीत मतांवर दरोडा टाकून भाजपचा उमेदवार जिंकून आणण्याचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाने हाणून पाडला. तरीही भाजप लोकशाहीवर प्रवचने झोडतो हे आश्चर्य आहे. मोदी व त्यांचे लोक जातील तेथे खोटे बोलतात. लडाख, कश्मीर, महाराष्ट्राच्या बाबतीत त्यांचा खोटेपणा अनेकदा उघडा पडला. देशात गोंधळाचे वातावरण निर्माण करून त्याच गोंधळात निवडणुका लढवाव्यात असे मोदी यांचे मत आहे. मोदी यांच्या काळात देशाचे संसदीय जीवन घसरणीला लागले. मोदी यांचे राज्य दहा वर्षे आहे. या काळात राजकारणात भंपकपणा, उथळपणा व थिल्लरपणा वाढला. मोदी काळात संसद व खासदारांना महत्त्व उरले नाही. त्यामुळे उद्या पुन्हा मोदींचेच राज्य आले तर संसदेला टाळे लावून कधीच निवडणुका होणार नाहीत याची तजवीज केली जाईल. जर्मनीत हिटलर अधिकारावर येण्यापूर्वी वैमार प्रजासत्ताक होते, पण ते राबविणारे पक्षच दुर्बळ होते. त्यांनी आपल्या वर्तनाने लोकांत संसदीय लोकशाहीसंबंधी घृणा निर्माण केली व हिटलरचा मार्ग सुकर केला. देशात आधीच हिटलरचा उदय झाला आहे व अंधभक्तांमुळे हिटलर दिवसेंदिवस अधिक बेताल, बेफाम होताना पाहत आहोत.

चार सौ पार!

पंतप्रधान मोदी हे चार दिवसांपूर्वी यवतमाळ, वाशीम येथे आले. त्यांनी एका सभेत सांगितले, “यावेळी भाजप चारशे पार जागा जिंकेल.” मोदी यांनी यूपीए काळात शेतीमंत्री असलेल्या शरद पवार यांच्यावर टीका केली. शेतकऱ्यांच्या बाबतीत तेव्हाच्या कृषीमंत्र्यांनी कर्तव्य पार पाडले नाही. एकेकाळी हेच मोदी कृषीमंत्री म्हणून शरद पवारांचा गौरव करीत होते व कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्मविभूषण’ पवारांना देण्यात आला. त्याच पवारांवर मोदी आता महाराष्ट्रात येऊन टीका करतात. ज्या यवतमाळ, वाशीममध्ये मोदी यांनी सभा घेतली त्याच भागात गेल्या सहा महिन्यांत 400 वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मागच्या दीड वर्षात विदर्भातच दोन हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यावर मोदी बोलत नाहीत व ‘यूपीए’ काळातील कृषीमंत्र्यांच्या कामगिरीवर बोलतात, हा भंपकपणा आहे.

गुजरातमध्ये नशा

मोदी-शहांच्या गुजरातमध्ये मुंबई-महाराष्ट्राचे उद्योग पळवले जात आहेत. त्याच गुजरात राज्यात जगभरातून ‘ड्रग्ज’ बिनबोभाट गुजरातच्या बंदरावर उतरत आहे. गेल्या पाच वर्षांत गुजरातच्या पोरबंदर-मुंद्रा बंदरावर प्रचंड प्रमाणात ड्रग्ज जप्त केले. चार दिवसांपूर्वी पोरबंदरच्या किनाऱ्यावरून 3500 किलो ड्रग्ज जप्त केले. 2020 ते 23 या काळात गुजरातच्या मुंद्रा बंदरावरून 50,000 कोटींचे ड्रग्ज जप्त केले. गुजरातमध्ये सातत्याने कोट्यवधींचे अंमली पदार्थ उतरत आहेत व तेथून ते देशभरात वितरित होत आहेत. इराण, पाकिस्तान आणि अमेरिकेतून हे ड्रग्ज देशात येते व सेफ लँडिंगसाठी हे देश गुजरातची भूमी निवडतात. गुजरातमध्ये आज भाजपचे सरकार आहे. देशाचे गृहमंत्री, पंतप्रधान गुजरातचे आहेत. तरीही गुजरात हे ‘ड्रग्ज’चे आंतरराष्ट्रीय केंद्र बनले. गुजरातमध्ये इतर कुणाचे राज्य असते तर भारतीय जनता पक्षाने त्या राज्याच्या सरकारला एव्हाना देशद्रोही ठरवून फासावर लटकविण्याची मागणी केली असती. गुजरातमधून ड्रग्ज मोठय़ा प्रमाणावर महाराष्ट्रात येत आहे. मुंबई, नाशिक, पुणे, नागपूरसारख्या शहरांतील तरुण पिढी ड्रग्जच्या विळख्यात सापडली आहे. गुजरातमध्ये ड्रग्ज पकडले, हे नाटक आणि देखावा आहे. कारवाईचे नाटक आहे. 50 कोटींचे पकडायचे व 50,000 कोटींचे ड्रग्ज सोडून देशात पाठवायचे. त्याच गुजरातचे महान पंतप्रधान महाराष्ट्रात येऊन चारशे जागा जिंकण्याची भाषा करतात. राजकारण, सत्ता, पैसा व केंद्रीय तपास यंत्रणांच्या मुक्त गैरवापरात मोदी अडकले आहेत. ते खोटे बोलतात. ते ड्रग्ज आणि भ्रष्टाचाराकडे डोळेझाक करतात व शेतकऱ्यांच्या नावाने खोटे अश्रू ढाळतात. अंधभक्त त्यावर टाळय़ा वाजवायला आहेतच. युक्रेनचे युद्ध दोन वर्षांनंतरही सुरूच आहे. ड्रग्जविरुद्धचे युद्ध सुरू करायला मोदी तयार नाहीत. या ड्रग्जवाल्यांनी पी. एम. केअर फंडात पैसे दिलेत, की इलेक्टोरल बॉण्डस् भाजपच्या तिजोरीत टाकलेत?

twitter – @rautsanjay61

Gmail- [email protected]