“शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाणार असल्याने भाजपने नवीन टेकू घेतला”, संजय राऊतांचे टीकास्त्र

“हा काही भूकंप आहे असं मी मानत नाही. काही गोष्टी घडणार होत्या त्या घडलेल्या आहेत. अजित पवार आणि 9 जणांनी शपथ घेतली त्यावरून असे दिसून येते की शिंदे फडणवीस सरकार अस्थिर आहे. 165 आमदारांचे सरकार असतानाही त्यांना अजित पवारांसह 35 आमदारांची गरज लागते याचा अर्थ काय शिंदेंच्या फुटीर गटासंदर्भात ते अपात्र आहेत, ते बेकायदेशीर आहेत व हे घटनाबाह्य सरकार आहे असा निवाडा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे लवकरच एकनाथ शिंदे यांच्यासह प्रथम 16 आमदार आणि नंतर उरलेले आमदार हे अपात्र ठरतील. शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाण्याची ही सुरुवात आहे. म्हणून भाजपने हा नवीन टेकू घेतला आहे.” असे मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

यावेळी ते म्हणाले की, “कोणावर कोणत्या केंद्रीय यंत्रणांचे खटले होते यात मला पडायचं नाही. यात असे अनेक लोक आहेत ज्यांच्या विरोधात भाजपने मोहीम राबवली होती. त्यांचं आता भाजप काय करणार? सरकारच एक इंजिन बंद पडण्याच्या मार्गावर आहे. म्हणून आता त्यांनी दुसरं इंजिन लावलं आहे. माझी आणि उद्धव ठाकरेंची शरद पवारांसोबत चर्चा झाली आहे. ते खंबीर आहेत. आम्ही सगळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात खंबीरपणे उभे राहू. लोकांचा याला पाठिंबा नाही. त्यामुळे आम्ही महाराष्ट्रात महाविकास आघाडी पुन्हा मजबुतीने उभी करू.”

“शिंदे गटाचा मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. त्यांच्यातले अनेक आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. आज त्यांचे चेहरे पहा. आता कोणतीही पळवाट शिंदेंना वाचवू शकत नाही. त्यामुळे राज्याला लवकरच नवा मुख्यमंत्री मिळेल. हे माझं भाकीत नसून परखड मत आहे. मी अजित पवारांबाबत सामना मधून जे लिहिलं होतं ते दीड महिन्यातच खरं ठरलं आहे. ज्यांना तुरुंगात पाठवणार होते, त्यांनाच मंत्रिपदाची शपथ दिल्यानंतर आता भाजप कोणती भूमिका घेणार आहे? बाकी जनता ठरवेलच.” असे राऊत म्हणाले.