‘शासन आपल्या दारी’तून जनतेचे प्रश्न सुटेनात, साताऱयातील नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

राज्य सरकारने ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबवूनही नागरिकांचे प्रश्न, समस्या सुटत नसल्याचे चित्र आहे. एकीकडे शासन या योजनेवर कोटय़वधी रुपयांचा खर्च करीत असूनही अनेकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सातारा जिह्यातीलच तब्बल 109 जणांनी स्वातंत्र्यदिनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. यामध्ये 61 जणांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे धरणे, निदर्शने, मोर्चा ही आंदोलनाची अस्त्र निष्प्रभ ठरत असल्यानेच सर्कसामान्य नागरिकांनी न्याय्य मागण्यांसाठी आत्मदहनाचे हत्यार उपसल्याचे चित्र आहे.

जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांकडून सर्वसामान्यांचे सर्वच प्रश्न सुटतातच असे नाही. ज्यावेळी प्रश्न सुटत नाही, न्याय डावलला जातो, अशावेळी गांजलेला, पिचलेला सर्वसामान्य व्यक्ती जिल्हाधिकारी कार्यालयाचे दार ठोठावतो. तेथेही त्याला न्याय मिळतोच असे नाही. मिळाला तरी काहीतरी त्रुटी ठेवली जाते. त्यामुळे अशा व्यक्तींना आंदोलनाचे अस्त्र हातात घ्यावे लागते. त्यासाठी धरणे, निदर्शने, मोर्चा या सामूहिक अस्त्र्चा वापर करावा लागतो. ही अस्त्रही पक्ष, संघटना, वापरतात; पण तीही आता निष्प्रभ ठरत आहेत.

सध्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारने ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबवला आहे. यामध्ये शासनाच्या विविध योजना जनतेच्या दारापर्यंत जाऊन राबवून त्याचा लाभ देणे तसेच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविणे हा उद्देश आहे. पण हा उद्देश पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे. येणाऱया स्वातंत्र्यदिनी जिह्यातील 109 जणांनी जिल्हा प्रशासनाला विविध मागण्या, प्रश्न, समस्या सुटत नसल्याने आंदोलनाचा इशारा दिला आहे. यामध्ये 61 जणांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. 38 जणांनी उपोषण करण्याची तयारी दर्शवली आहे. तीही जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच तसेच विविध मागण्यांसाठी 11 आंदोलने होणार आहेत.

प्रशासन लोकाभिमुख आहे का?

 स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय उत्सवाच्या दिवशी दुर्दैवाने एखादी घटना घडली, तर ती प्रशासनाच्या दृष्टीने नामुष्की मानली जाते. त्यामुळे आत्मदहनाच्या अस्त्रचा नेमका काय उपयोग होतोय, हे लोकांना पाहायचे आहे. याची प्रचीती जिह्यातील 61 जणांच्या आत्मदहनाच्या इशाऱयातून येत आहे. आता या सर्वाची पोलीस प्रशासन समजूत काढण्याचा प्रयत्न करेल; पण प्रश्न सुटत नाही, तो तसाच भिजत राहतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिह्यातच 61 जणांनी आत्मदहनाचा इशारा दिल्याने जिह्यातील महसूल प्रशासन अद्यापि लोकाभिमुख आहे का, असा प्रश्न निर्माण होताना दिसतो.