सिनेट निवडणूक पुन्हा लांबणीवर

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम दोन आठवडय़ांत जाहीर करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली.

ऍड. सागर देवरे यांनी ही याचिका केली होती. सिनेट निवडणुकीला आधीच उशीर झाला आहे. त्यात मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीची प्रक्रिया नव्याने राबवणार आहे. तसे न करता विद्यापीठाकडे असलेल्या मतदार यादीनुसार सिनेट निवडणूक घ्यावी, अशी मागणी ऍड. देवरे यांनी केली होती.

न्या. ए. एस. चांदुरकर व न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. विद्यापीठाने आधीची मतदार यादी रद्द केली आहे. ही प्रक्रिया नव्याने राबवली जाणार आहे. मुळात मतदाराची नोंदणी रद्द करण्याची तरतूद कायद्यात आहे. संपूर्ण मतदार यादी रद्द करता येत नाही, असा दावा ऍड. राजकुमार अवस्थी यांनी केला.

मतदार यादीत घोळ होता. त्यामुळे ही यादी रद्द करण्यात आली, असा युक्तिवाद विद्यापीठाकडून वरिष्ठ वकील अनिल साखरे यांनी केला. उभयंतांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.

सुप्रीम कोर्टात जाणार

विद्यापीठ राजकीय दबावाखाली काम करत आहे. हेतूपुरस्सर विद्यापीठाने 90 हजार मतदारांची यादी रद्द केली. उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली असली तरी त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका केली जाईल, अशी माहिती ऍड. देवरे यांनी दिली.