वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांची आत्महत्या

पुणे पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागात कार्यरत असलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण (रा. विश्रांतवाडी) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येमुळे पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. डॅशिंग ऑफिसर म्हणून त्यांचा नावलौकिक होता. कौटुंबिक वादातून त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागत शिल्पा चव्हाण प्रभारी वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. मागील दोन वर्षांपूर्वी लॉकडाऊन कालावधीत नागरिकांनी प्रवासासाठी वेळेत ई-पासेस देण्यात त्यांची मोलाची भूमिका होती. विविध धडक कारवायांमुळे त्या डॅशिंग ऑफिसर म्हणून परिचित होत्या. शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास विभागातील कर्मचारी त्यांना कार्यालयात आणण्यासाठी गाडी घेऊन विश्रांतवाडीला गेले होते. कर्मचाऱ्यांनी वारंवार फोन करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली असता, दरवाजा आतून बंद होता. शंका आल्यामुळे कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी ओढणीच्या साह्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.