काही नालायक लोक हिंदू आणि हिंदुत्वात भेदभाव करताहेत, उद्धव ठाकरे यांचा जोरदार प्रहार

‘मातोश्री’वर आम्हाला वाचवा म्हणून अनेक जण मदत मागण्यासाठी आले होते. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्या वेळी ज्यांना वाचवले तेच शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत, हिंमत असेल तर त्यांनी शिवसेना संपवून दाखवावीच, असे खुले आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नामोल्लेख न करता भाजपला दिले. आम्ही हिंदू आहोत असे गर्वाने सांगत असताना काही नालायक लोक हिंदू आणि हिंदुत्वात भेदभाव करत आहेत, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

‘मातोश्री’ येथे भाजप, विहिंप, बजरंग दलाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश  केला. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. भगव्यात फरक नसतो. भगवा हा भगवाच असतो. श्रीकृष्ण, श्रीराम, भवानी माता या सर्वांचा भगवा आहे, पण त्यातही काही जण भेद करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

शिवसेना कधीच भेदभाव करत नाही

1992 च्या जातीय दंगलीत शिवसेनेनेच मुंबईला वाचवले याची आठवण करून देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जातीय दंगली असोत वा मुसळधार पाऊस, मुंबईवर कोणतेही संकट येते तेव्हा मदतीसाठी धावून जाण्याची शिकवण आम्हाला बाळासाहेबांनी दिली आहे. रक्तदान करताना ते रक्त कोणाचे आहे, कोणाला वापरणार हे शिवसैनिकांनी पाहिले नाही. शिवसेना कधीच भेदभाव करत नाही, असे ते म्हणाले. तुम्ही परप्रांतीय, उत्तर हिंदुस्थानी आहात असा भेदभाव आम्ही केला नाही, आपण सगळे हिंदू आहोत, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

भाजपवाले शिवसेनेने शेकलेली भाकरी खाताहेत

हिंदू आहोत असे बोलायला लोक घाबरत होते त्या वेळी बाळासाहेबांनी ‘गर्व से कहो हम हिंदू है’ अशी घोषणा दिली होती. हिंदू पुढे हिंदू म्हणून मतदान करतील असे त्यांनी भाजपच्या प्रमोद महाजनांना सांगितले होते, पण संघर्ष करणारे आता राहिलेले नाहीत. सत्तेवर पोहोचलेले फक्त शेकलेली भाकरी खात आहेत. लाभ उठवत आहेत. ज्यांनी कष्ट घेतले ते आज आपल्यात नाहीत आणि जे आहेत त्यांना लांब करण्यात आले आहे, अशी सडकून टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली.