गृहखात्याची जबाबदारी असलेल्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी; शरद पवार यांचा अनुल्लेखाने फडणवीसांना टोला

गोवारी आंदोलनाच्या वेळी नैतिक जबाबदारी स्वीकारून तेव्हाचे आदिवासी कल्याणमंत्री मधुकर पिचड यांनी राजीनामा दिला होता. आंतरवाली येथील लाठीहल्ल्याची नैतिक जबाबदारी आता गृहखात्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते स्वीकारणार आहेत का, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला. शांततेच्या मार्गाने सुरू असलेले मराठा आंदोलन पोलिसांनी बळाचा वापर करून चिरडल्याचेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आंतरवाली सराटी येथे जाऊन मराठा आंदोलकांची भेट घेतली. मनोज जरांगे पाटील यांच्याशीही पवार यांनी चर्चा केली. अंबड येथे जाऊन रुग्णालयात उपचार घेत असलेल्या लाठीहल्ल्यातील जखमींची त्यांनी विचारपूस केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याचा पवारांनी कडक शब्दांत निषेध केला. शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू होते; परंतु पोलिसांनी मध्येच अतिरेकी बळाचा वापर केला, असे जखमींनी सांगितल्याचे पवार म्हणाले. पोलिसांनी लाठीहल्ला करताना लहान मुले पाहिली नाहीत… वृद्ध पाहिले नाहीत… महिला पाहिल्या नाहीत… मनाला वाटेल तसा बळाचा वापर करण्यात आला, असे पवार म्हणाले.

काल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोवारी हत्याकांडाच्या वेळी शरद पवार मुख्यमंत्री होते, त्यांनी त्यावेळी राजीनामा दिला नव्हता, अशी टीका केली होती. त्याचा शरद पवारांनी आज समाचार घेतला. गोवारी प्रकरण घडले त्यावेळी मी मुंबईत होतो. परंतु गोवारी प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून त्यावेळचे आदिवासी कल्याणमंत्री मधुकर पिचड यांनी राजीनामा दिला होता. आता ज्यांच्यावर गृहखात्याची जबाबदारी आहे, ते नैतिकता दाखवणार का, असा फडणवीसांचा नामोल्लेख न करता पवारांनी टोला मारला. त्यावेळी सरकारने कसे काम केले, याचा वस्तुपाठ घेतला तर बरे होईल, असेही पवार म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा शब्द पाळला नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द दिला होता; परंतु त्यांनी तो शब्द पाळला नाही. सरकारने शब्द न पाळल्यानेच हे आंदोलन सुरू झाले होते. आंदोलन संयमी होते; पण एका बाजूने चर्चा करण्यात आली आणि दुसर्‍या बाजूने लाठीहल्ला करण्यात आला. आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे; परंतु आंदोलकांनी आपल्या मागणीसाठी आंदोलन सुरूच ठेवावे, असेही शरद पवार म्हणाले. आंदोलन करत असताना कायदा हातात घेण्याचा कुणीही प्रयत्न करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

कुठून तरी फोन आला…

प्रशासनाशी आमची शांततेत चर्चा सुरू होती. या चर्चेतून मार्ग निघेल अशी आशा होती. चर्चा सुरू असतानाच अचानक पोलिसांचा मोठा फौजफाटा आला आणि कुठून तरी फोन आला आणि पोलिसांचा उपोषणाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. कोणताही सारासार विचार न करता पोलिसांनी लाठीहल्ला केल्याचे जखमींनी सांगितल्याचे शरद पवार म्हणाले.

रास्तारोकोमुळे पवार दुसर्‍या मार्गाने छत्रपती संभाजीनगरकडे

समर्थ सहकारी कारखान्यासमोरील उड्डाणपुलाखाली लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ प्रचंड रास्तारोको करण्यात आला. आंदोलकांनी टायरही जाळले. या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा तीन किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. याचा फटका आंतरवाली सराटी येथून छत्रपती संभाजीनगरकडे निघालेल्या शरद पवार यांनाही बसला. दोन्ही बाजूने रस्ता जाम असल्यामुळे त्यांना पैठणमार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जावे लागले.