अमित शहांची चूक शरद पवारांनी पकडली, म्हटले संपूर्ण यादीच देतो

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करताना भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी अमित शहांचीच चूक पकडली. ही चूक लक्षात आणून दिल्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला होता. सोनिया गांधींना त्यांच्या मुलाला पंतप्रधान करायचे आहे, शरद पवारांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायचे आहे अशी टीका अमित शहांनी केली होती.

कोल्हापुरात पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांना अमित शहांनी केलेल्या टीकेबद्दल विचारण्यात आले. यावेळी ते म्हणाले की माझी मुलगी विधानसभेला उभी राहात नाही ती लोकसभेत निवडून आली आहे, आणि आताही लोकसभेला उभी राहणार आहेच हे अमित भाईंना कळालं पाहिजे. ‘त्यांच्या पक्षात एका कुटुंबातील 2-2 लोकं कसे आहेत आणि किती आहे याची मी यादी देऊ शकतो.’ असं म्हणत पवारांनी अमित शहा यांना टोला लगावला.

श्वेतपत्रिका म्हणजे धमकी

अशोक चव्हाण हे काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणे हे अनेकांसाठी आश्चर्याचे होते मात्र माझ्यासाठी ते आश्चर्याचे अजिबात नव्हते असे पवार यांनी म्हटले . भाजपने गेल्या 10 वर्षांची कामगिरी आणि विरोधकांबद्दलची मते यासंदर्भात श्वेतपत्रिका काढली. यात आदर्श सोसायटी आणि अशोक चव्हाणांचा उल्लेख होता. या उल्लेखानंतर आम्हाला असं वाटायला लागलं होतं की कदाचित ही धमकावणी असल्याची शक्यता आहे. या धमकीचे परीणाम काय झाले ते आपण पाहात आहात असे पवार यांनी म्हटले.

मोदींचे मुमकीन आम्ही सतत बघत असतो

जे निवडणुकीसंदर्भात जे सर्व्हे झाले त्यात 50 टक्क्यांहून अधिक जागा आमच्या लोकांना मिळत आहे. त्यामुळे काही राज्ये काहीही करून अस्थिर कशी करता येतील या दृष्टीने ते पावले टाकत आहे यासाठी ते केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत आहेत. भाजपवाल्यांचे म्हणणे आहे की, मोदी है तो मुमकीन है. त्यांचे हे मुमकीन आम्ही सतत बघत असतो, अशी टीका शरद पवार यांनी केली.