देशात ब्रिटिशराज, मोदींची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने; शरद पवार यांचा घणाघात

सोलापूरमधील माढा लोकसभा मतदारसंघात मोडनिंबमध्ये महाविकास आघाडीची प्रचारसभा झाली. यासभेत महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.

शरद पवार यांनी भाषणाची सुरुवात करताना पंतप्रधान मोदींच्या 2014 निवडणुकीतील एका भाषणाची ऑडिओ क्लीप माइकवरून सभेतील नागरिकांना ऐकवली. ’50 दिवसांत महागाई कमी करण्याचे आश्वासन मोदींनी त्यावेळी दिले होते. पण त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. सामान्यांची महागाईतून सुटका केली नाही. आणि शिव्या आम्हाला घालतात. 10 वर्षांत तुम्ही काय केलं? राज्य तुमच्याकडे, आम्ही विरोधी पक्षात आणि जबाबदार आम्हाला का धरता? याचा अर्थ मोदी हे दिलेले शब्द पाळत नाहीत’, असा हल्ला शरद पवार यांनी चढवला.

सातारला दोन खासदार हवे असतील तर शशिकांत शिंदे यांनाच विजयी करा!

‘जावयाच्या घरचं अवताण जेवल्याशिवाय खरं नाही, अशी आपल्याकडे म्हण आहे. आशीच स्थिती मोदींनी या देशात निर्माण केली आहे. मोदींच्या राजवटीत सामान्य माणसाचा अधिकार त्यावर संकट येण्याची शक्यता आहे. या कारण दिल्लीत आहे. दिल्लीत अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री आहेत. गेल्या तीन वेळेपासून ते निवडून येत आहेत. राजधानी दिल्लीत त्यांचं काम उत्तम आहे. शिक्षण आणि आरोग्य सुविधा दिल्या. दिल्लीचा चेहरा बदलला. इतकं उत्तम काम त्यांनी केलं. पण केंद्र सरकार सहकार्य करत नाही, असं म्हटल्यावर त्यांनी मोदींवर टीका केली. आज त्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं आहे. देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री तुरुंगात आहे. अशीच स्थिती झारखंडची आहे. हेमंत सोरेन यांनी केंद्र सरकार टीक केली म्हणून आदिवासी मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकलं आहे. याचा अर्थ इंग्रजांच्या काळात ज्या पद्धतीने धरपकडी होत होत्या, लोकांना संघर्ष करावा लागत होता, आज तशी अवस्था मोदींनी या देशात केली आहे. त्यांचं सर्व कामकाज हे हुकूमशाहीचे दिशेने सुरू आहे’, असा घणाघात शरद पवार यांनी केला.

‘कुठेही भाषण केलं की मोदी हे जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यावर टीका करतात. गांधींची सगळी हयात देशासाठी काम करण्यासाठी गेली. स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधींचे विचार स्वीकारून जवाहरलाल नेहरूंनी आपल्या आयुष्याची 10-11 वर्षे इंग्रजांच्या तुरुंगात घालवली. नंतर स्वातंत्र्य मिळवून दिलं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देश लोकशाहीच्या दिशेने वाटचाल करू लागला’, असे शरद पवार म्हणाले.

भावाच्या पराभवाचा बदला घेणार! रोहित पवारांची प्रतिज्ञा

‘बेरोजगारांच्या हाताला काम देऊ, असं आश्वासन पंतप्रधान मोदींनी 2014 मध्ये दिलं होतं. आता इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ही संस्था जगभरातील रोजगाराचा अभ्यास करते. या संस्थेने हिंदुस्थानातील रोजगारांचा आढावा घेतला. या अहवालात देशातील 100 तरुणांपैकी 87 जण बेरोजगार असल्याची माहिती समोर आली आहे. मग मोदींनी कसली बेकारी घालवली? त्या आश्वासनाचं काय झालं?’, असा सवाल शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना केला.