शोमध्ये बनावट चेक देतात; ‘शार्क टँक इंडिया’चे शार्क अमित जैन यांनी फोडलं गुपित!

‘शार्क टँक इंडिया’च्या तिसऱ्या सिझनचा शेवट हा 31 मार्चला झाला. मात्र अजूनही या शोशी संबंधित बातम्या तसेच त्याबाबतचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकत्याच एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ‘शार्क टँक इंडिया’चे शार्क अमित जैन यांनी शोबद्दल एक धक्कादायक माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी सिलेक्ट झालेल्या व्यावसायिकांना देण्यात येणाऱ्या चेकबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

एका यूट्यूबरसोबत केलेल्या पॉडकास्टमध्ये अमित जैन यांनी ‘शार्क टँक इंडिया’मधील व्यावसायिकांना दिलेल्या चेकचे सत्य सांगितले. व्यावसायिकांना दिलेले चेक हे बनावट असल्याचे म्हटले आहे. ते चेक केवळ कॅमेऱ्यामध्ये दिसण्यासाठी आणि लोकांना दाखवण्यासाठी प्रतिकात्मकपणे वापरले जातात. जरी या चेकवर शार्कची नावे आणि त्यांच्या कंपनीचे लोगो असले तरी, धनादेश त्यांच्या खात्यांशी जोडलेले नसतात. तसेच त्या चेकवर असलेले खाते क्रमांक देखील चुकीचे असतात. ‘शार्क टँक इंडिया’मध्ये आलेल्या व्यावसायिकांसोबत डील झाल्याचे प्रेक्षकांना दाखवण्यासाठी बनावट चेकचा वापर केला जातो, असे अमित जैन यांनी सांगितले.

व्यवहार करण्यासाठी वापरण्यात आलेले चेक बनावट असले तरी व्यावसायिकांसोबत केलेले डील मात्र पूर्णपणे खरे असतात. व्यावसायिकांसोबत बोलल्यानंतर, शार्क टीम त्यांनी दिलेली माहिती बरोबर आहे की नाही याची पडताळणी करते. त्यांच्या पडताळणीनंतर, व्यवसायिक आणि शार्क यांच्यात करार केला जातो. या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतरच त्यांना शार्ककडून चेक दिला जातो. त्यानंतर दोघांमधील डील पूर्ण होते, असे अमित जैन यांनी स्पष्ट केले.