औषधांचा तुटवडा, कर्मचाऱयांची कमतरता शिव आरोग्य सेनेची सुषमा स्वराज प्रसूतिगृहावर धडक

औषधांचा तुटवडा, नादुरुस्त रुग्णवाहिका आणि कर्मचाऱयांच्या कमतरतेमुळे भांडुपच्या सुषमा स्वराज प्रसूतिगृहात येणाऱया गोरगरीब रुग्णांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर शिव आरोग्य सेनेच्या पदाधिकाऱयांनी मंगळवारी रुग्णालयाच्या सहाय्यक अधिष्ठाता डॉ. श्रद्धा माहीमकर यांची भेट घेत रुग्णांना भेडसावणाऱया अडचणी लवकरात लवकर दूर करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर यांच्या सूचनेनुसार व महाराष्ट्र राज्य समन्वयक जितेंद्र सकपाळ यांच्या उपस्थितीत शिव आरोग्य सेनेच्या पदाधिकाऱयांनी सुषमा स्वराज प्रसूतिगृहाला धडक दिली. रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसतात. सिस्टर इनचार्ज, आया, वॉर्डबॉय, स्वच्छता कर्मचारी, सोनोग्राफीसाठी लागणाऱया सुविधांचादेखील तुटवडा आहे. रुग्णालयातील रुग्णवाहिका वारंवार नादुरुस्त असते, रुग्णालयात शासकीय औषधांचा तुटवडा असतो आदी समस्यांकडे शिव आरोग्य सेनेने डॉ. माहीमकर यांचे लक्ष वेधून कार्यवाहीची मागणी निवेदनाद्वारे केली. यावेळी शिव आरोग्य सेनेचे मुंबई जिल्हा संपर्क समन्वयक अमोल वंजारे, जिल्हा समन्वय सचिव ज्योती भोसले, मुंबई उपनगर (पू.) सहसमन्वयक प्रकाश वाणी, समन्वयक सचिव शिवाजी झोरे, भांडुप विधानसभा सह समन्वयक सचिव प्रवीण ढवळे आदी उपस्थित होते.