कांजूर डंपिंग ग्राऊंड तत्काळ बंद करा, अन्यथा रास्ता रोको! शिवसेनेचा महापालिकेला इशारा

शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी उपायुक्त देविदास क्षीरसागर यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी माजी महापौर दत्ता दळवी, माजी नगरसेविका राजराजेश्वरी रेडकर, विधानसभाप्रमुख परम यादव, उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव, उपविभाग संघटक रश्मी पहुडकर, विधानसभा संघटक शंकर ढमाळे, धर्मनाथ पंत, शाखाप्रमुख दीपक सावंत, बाबू शिंदे, संतोष मामा, सचिन चोरमळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

विक्रोळी मतदारसंघामधील कांजूर डंपिंग ग्राऊंडच्या दुर्गंधीचा विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप तसेच मुलुंडपासून ते कुर्ल्यापर्यंतच्या रहिवाशांना त्रास होत आहे. त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचऱयावर रासायनिक फवारणी करूनही दुर्गंधी कमी होत नाही. त्यामुळे कांजूरमधील डंपिंग ग्राऊंड तत्काळ बंद करा नाहीतर रास्ता रोको करू, असा इशारा शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी महापालिका प्रशासनाला दिला.

विक्रोळी मतदारसंघातील समस्यांबद्दल आमदार सुनील राऊत यांनी महापालिकेच्या एस विभागातील कार्यालयात परिमंडळ-6चे उपआयुक्त देविदास क्षीरसागर यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. यावेळी मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱयांसोबत सविस्तर चर्चा करून समस्या तत्काळ सोडवण्यासाठी सूचना दिल्या. कांजूरमधील डंपिंग ग्राऊंडमुळे आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न बिकट झाला असून यावर तत्काळ उपाययोजना करून रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी सूचना सुनील राऊत यांनी केली.

इतर मागण्या
– कन्नमवारनगर आणि टागोरनगर येथील मलःनिस्सारण वाहिनीचे उन्नतीकरण तसेच जलवाहिनी म्हाडाकडून पालिकेकडे हस्तांतरित करा.

– कन्नमवारनगर आणि टागोरनगर येथील वाढता विकास लक्षात घेता पार्ंकगची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी मोकळ्या भूखंडावर वाहनतळ आणि मार्पेट विकसित करणे.
क्रांतीवीर महात्मा जोतिबा फुले रुग्णालयाचा पुनर्विकास तातडीने सुरू करणे… तोपर्यंत याच परिसरात पर्यायी रुग्णालय व्यवस्था करा.

– कन्नमवारनगर आणि टागोरनगर येथे स्वतंत्र अग्निशमन केंद्र स्थापन करा.

– छत्रपती संभाजी मैदानात शौचालय, शांतीवन मैदानात विद्युत पोल बसवून दिवाबत्तीची सोय करा आणि सर्व सोसायटय़ांमध्ये कचरा पेटी उपलब्ध करा.