सरकारच्या चड्डीच्या नाड्या दिल्लीत, कधीही खेचतात; संजय राऊत यांची मिंध्यांवर सडकून टीका

महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यूचे तांडव सुरू असताना मुख्यमंत्री वारंवार दिल्लीला पळताहेत. कारण मिंधे सरकारच्या चड्डीच्या नाड्या दिल्लीत आहेत. ते कधीही खेचतात अन् कधीही टाइट करतात. त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला पळतात, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मिंधे सरकारचा खरपूस समाचार घेतला. शासकीय रुग्णालयातील मृत्युंची जबाबदारी सरकारची असून यापासून ते पळ काढू शकत नाही असे उच्च न्यायालयही म्हणतंय. नागपूर, नांदेड, नाशिका, छत्रपती संभाजीगनरस अनेक जिल्ह्यातील बातम्या येत आहेत, मात्र सरकार कुठे आहे? असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.

दै. सामनाच्या आजच्या ‘मुख्यमंत्री कुठे आहे?’ या अग्रलेखात फडणवीस डमरू वाजवतात आणि दोघे नाचतात अशा शब्दात घणाघात करण्यात आला आहे. माध्यम प्रतिनिधींनी याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, ‘फडणवीस मदारी असून दोघे नाचताहेत. त्यांच्या हातात काय आहे? त्यांच्या चड्डीच्या नाड्या दिल्लीत आहेत. त्यामुळे वारंवार हा नाडा ढिल्ला किंवा टाइट करायला त्यांना दिल्लीला पळावे लागते. गेल्या आठ दिवसात शासकीय रुग्णालयात दीडशेहून अधिक लोकं गेली आणि मुख्यमंत्री दिल्लीत आहेत. रात्री, पहाटे कधी बघावे तर मुख्यमंत्री दिल्लीत. काय आहे दिल्लीला? मुळात हे सरकार शिंदे, फडणवीस किंवा अजित पवारांनी आणलेले नाही. हे सरकार दिल्लीतून ईडी, सीबीआय आणि आयटीने आणले आहे. कालच शरद पवारांनी सांगितले की अजित पवार का पळून गेले. चौकशीच्या भीतीने घाबरून ते पळून गेले आहेत.’

मुंबईत मुख्यमंत्र्यांनी जेपी नड्डा यांच्या स्वागताचे मोठे होर्डिंग लावले आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे चेले म्हणवणाऱ्यांवर काय वेळ आलीय. स्वत:ला शिवसेना म्हणता आणि फलक भाजप नेत्यांच्या स्वागताचे लावता, कधी बघावे तेव्हा दिल्लीला पळता. ही चायना मेड शिवसेना आहे, असा टोला राऊत यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेती अवस्था अत्यंत बिकट आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आम्ही कोरोनाशीही सामना केला. मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी किती चांगले काम केले याचे जगाने कौतुक केले. धारावीसारखा भाग मुंबईत असतानाही उत्तमपणे काम करून मुंबई आणि महाराष्ट्र आम्ही वाचवला.

राज्यात आरोग्य सुविधा सलाईनवर, वैद्यकीय शिक्षण विभागात 42 टक्के जागा रिक्त

संताजी घोरपडे साखर कारखान्यातील मनी लँड्रींग प्रकरणात हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलाच्या सहभागाबाबत उच्च न्यायालयाने महत्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. यावर भाष्य करताना राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचे उजवे हात असणाऱ्या राहुल कुल यांच्या भीमा-पाटस सहकारी कारखान्यात 500 कोटींचे मनी लँड्रींग आहे. गिरणा सहकारी कारखान्यात 167 कोटींचे मनी लँड्रींग आहे, पण दादा भूसे सध्या मंत्री आहेत. हसन मुश्रीफ यांनाही हे जेलमध्ये पाठवणार होते, पण त्यांना थेट मंत्रीमंडळात घेतले. त्यामुळे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत असे अनेक साखर कारखान्यातील लोक सध्या मुलुंडला असतात आणि आम्हालाही मंत्री करा सांगतात. संताजी घोरपडे साखर कारखान्यातील मनी लँड्रींग प्रकरणात मुश्रीफ यांना तुरुंगात टाकायला कोण निघालेले? भाजपवाले आणि त्यांचा नागडा पोपटलालच ना, मग आता काय झाले? ज्या माणसाने गेल्या 10 वर्षात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, ते सगळे आज भाजपमध्ये उच्च पदावर आहेत, असेही राऊत म्हणाले.