मोदींची हवा आता संपली, लोकसभेनंतर मिध्यांचेही अस्तित्व संपणार; संजय राऊत कडाडले

राज्यात महाविकास आघाडी आघाडीवर आहे. तसेच देशातही इंडिया आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सत्तापरिसवर्तन होणारच आहे. नरेंद्र मोदी आणि भाजपच्या भूलथापांना आता जनता भूलणार नाही. राज्यात मोदी यांच्या सभेला प्रतिसाद मिळताना दिसत नाही. तसेच मोदी आणि त्यांचा पक्ष किती खोटारडा आणि फसवा आहे, हे जनतेला समजले आहे, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला. ते जळगावमध्ये पत्रकरांशी बोलत होते.

नरेंद्र मोदी, अमित शहा आणि त्यांचे चेलेचपाटे यांनी जनतेची दिशाभूल, फसवणूक करत विजय मिळवला आहे. मात्र, राज्यासह देशभरातील वातावरण झपाट्याने बदलत आहे. सर्व वातावरण बदलताना आपल्याला दिसत आहे. मोदी यांच्या फसवेगिरीला आणि भूलथापांना देशातील जनता आता भूलणार नाही. महाराष्ट्रात होणाऱ्या मोदी यांच्या सभांना जनतेचा प्रतिसाद मिळत नाही. सभा सुरू कधी झाली, संपली कधी, मोदी परत कधी गेले, हे कोणालाच समजत नाही. गेल्या 10 वर्षात मोदींची हवा निर्माण करण्यात आली होती. ती आता संपलेली आहे. राज्यात महाविकास आघाडी आता आघाडीवर आहे. तसेच खान्देशातील सर्व जागांवर महाविकास आघाडीचेच उमेदवार विजयी होणार आहेत, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.

लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे अस्तित्व महाराष्ट्रतून संपलेले असेल. कोणाचे संतुलन बिघडले आहे आणि कोणाचे काय झाले, हे 4 जूननंतर समजेल. अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवारच विजयी होणार आहे. नवनीत राणा या तिसऱ्या क्रमांकावर असतील, असेही संजय राऊत म्हणाले. सिंचन घोटाळा आणि शिखर बँक घोटाळा यातील 70 हजार कोटींच्या घोटाळ्याबाबत नरेंद्र मोदी घसा फाटेपर्यंत आरोप करत होते. आता आरोपी भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये आल्यानंतर त्यांना शिखर बँक घोटाळ्यातून क्लिनचीट मिळते. यावरून मोदी किती खोटारडे आहेत आणि त्यांचा पक्ष किती फसवा आहे, हे दिसून येते, असेही संजय राऊत म्हणाले. मोदी हे खोटं बोलणारे नेते आहेत, 4 जूनननंतर ते पदावर दिसणार नाहीत, सत्तापरिवर्तन होणार आहे, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.