शिवसेनेच्या सातबारावर गद्दारांचे नाव लिहिणाऱ्या भाजपविरोधात जनतेत रोष; उद्धव ठाकरे यांचा घणाघात

महाविकास आघाडीचे नांदडमधील उमेदवार वसंत चव्हाण यांच्या प्रचारासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सर्वसामान्य जनतेची आणि शेतकऱ्यांची व्यथा व्यक्त केली. तसेच भाजपच्या हुकूमशाहीवर कडाडून हल्ला चढवला. जनता आता भाजपच्या हुकूमशाहीमुळे त्रस्त आहे. जनतेत भाजपविरोधात रोष आहे. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडी सर्वच्या सर्व 48 जागा जिकंणारच, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

आमची आणि मित्रपक्षांची इच्छा होती की नांदेडमध्ये सभा घ्यावी, पण वेळेची अडचण येत आहे. 2019 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. राज्यात काही जणांनी गद्दारी केली, ती गद्दारी झाली नसती तर महाविकास आघाडी सरकार राज्याला पुढे घेऊन गेले असते. आता आम्ही एकत्र निवडणुका लढत आहोत. 2019मध्ये आम्ही निवडणुका वेगवेगळ्या लढत नंतर एकत्र आलो होतो. आता आम्ही निवडणुका एकत्र लढत आहोत. या निवडणुकीत महाविकास आघाडीचाच विजय होणार आहे. आम्ही सर्व 48 जागा जिंकण्याच्या जिद्दीने लढवत आहोत, तसेच जनतेतील भाजपविरोधातील रोष पाहता सर्व 48 जागा महाविकास आघाडीच जिंकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीत एकजूट आहे. मित्रपक्षांचे कार्यकर्ते महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशी एकजूट असल्याने विजय निश्चित आहे. सध्या देशात हुकूमशाहीविरोधात लाट उसळली आहे. हे पुन्हा सत्तेत आले तर संविधान बदलतील, अशी भीती सर्वांच्या मनात आहे. तसेच सर्वच वर्गाच असंतोष आहे. शेतकरी स्वतःहून सांगतात की, आमचे मत महाविकास आघाडीलाच देणार आहोत. शेतकरी म्हणतात की, मोदी सरकारने संकटाच्या काळात साथ देणाऱ्या शिवसनेच्या सातबारावर गद्दारांचे नाव लिहिले, ते पुन्हा सत्तेत आले तर आमच्या सातबारावर उपऱ्यांचे नाव लिहिले तर आम्ही कोणाकडे जायचे, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.

कठीण काळात तुम्ही त्यांच्यासोबत राहिला, असे असूनही तुमच्या शिवसेनेला ते नकली सेना म्हणत असतील, तर आम्हालाही नकली शेतकरी म्हणतील, अशी भीती आम्हाला आहे. आमची जमीन चोरतील, हा मोठा धोका आहे, अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. गेल्या 10 वर्षांतील त्यांच्या नाकर्तेपणा उघड झाला आहे. त्यांची हुकूमशाही वाढत आहे. सूरतमध्ये जादू झाली. भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आला. देशात अशी जादू-जादू सुरू आहे. अशी जादू सुरू राहिली तर सर्वसामान्य माणूस आणि शेतकरी कसा राहणार, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे. यावर महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी हे उत्तर आहे, असे शेतकऱ्यांनी ठरवले आहे, असेही उध्व ठाकरे यांनी सांगितले.

संसदेच्या अधिवेशनात विरोधी पक्षांचे सुमारे 150 खासदार निलंबित करत त्यांनी मनमानी करत काही कायदे मंजूर करून घेतले. त्यामुळे ते संविधान आणि घटना बदलतील अशी भीती सर्वसामान्यांमध्ये आहे. त्यामुळे जनतेच्या पाठिंब्याने राज्यात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी विजयी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भाजपनने त्यांच्यासोबत असलेल्यांना झेडप्लस, वाय प्लस सुरक्षा दिली आहे. मात्र, सर्वसामान्यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. राज्यात महिला सुरक्षित नाहीत, सलमान खानच्या घरासमोरही गोळाबार करण्यात आला. त्यांचाच पक्षाचा आमदार गणपत गायकवाड पक्षात कोणी ऐकत नाही, या उद्विगतेने पोलीस ठाण्यातच गोळीबार करतो.सर्वसामान्य जनता सुरक्षित नसताना गद्दारांना कडेकोट सुरक्षा पुरवली जातेय, त्या सुरक्षेचा खर्च कोण करत आहे, असा सवालही त्यांनी केला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली होती, ती गद्दारांना सुरक्षित का वाटली, सुरतमधून महाराष्ट्र लुटण्याचा प्रयत्न होत आहे. अशोक चव्हाण काँग्रेसमधून बाहेर पडल्याने नव्या चेहऱ्यांना संधी मिळत आहेत. त्यांनी रस्ते अडवले होते आता बरेचजण पुढे येत आहेत. काँग्रेसमध्ये चैतन्य आले आहे. अशोक चव्हाण यांनी शहीदांची फसवणूक केली असा भाजपच्या आरोप होता. आता त्याच फसवणुकीमध्ये भाजप सहभागी झाला आहे, असे आपले स्पष्ट मत आहे. भाजपने देशावर हुकूमशाहीचे संकट आणले आहे. त्यामुळे जनतेने आता या हुकूमशाही वृत्तीचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा द्यावा आणि नांदेडमध्ये झालेला चिखल स्वच्छ करावा, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.