IPL 2024: स्वस्तात मस्त, खेळ जबरदस्त; 20 लाखांच्या खेळाडूंची आयपीएलमध्ये धम्माल

आयपीएलमध्ये कुणाची लॉटरी कधी लागेल हे सांगताच येत नाही. एकीकडे 20 कोटींची किंमत मिळूनही सुपरस्टार फ्लॉप ठरताहेत, तर दुसरीकडे अवघ्या 20 लाखांच्या बोलीत विकत घेतलेले सामान्य खेळाडू आयपीएलमध्ये धम्माल करत आहेत. जो खेळ कोटींची कमाई करणाऱया खेळाडूंना जमला नाही ती किमया छोटय़ा बजेटच्या खेळाडूंनी करत सर्वांचे डोळे फिरवले आहेत. थोडक्यात काय तर ‘स्वस्तात मस्त, खेळ जबरदस्त’ असेच म्हणावे लागेल.

यंदाच्या आयपीएलमध्येही बिग बजेट सुपरस्टार खेळाडू सुपरफ्लॉप ठरत असताना पंजाबने अवघ्या 20 लाखांत खरेदी केलेल्या शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा या दोघांनी आयपीएलमध्ये सनसनाटी निर्माण केली आहे. या दोघांच्या झुंजार खेळाने पंजाबच्या संघात अक्षरशः जान आणली आहे. शशांकने चक्क 48.75 च्या सरासरीने 195 धावा ठोकल्या आहेत. त्याच्या जोडीने सातत्यपूर्ण खेळ करणाऱया आशुतोष शर्माने आपल्या पाच सामन्यांच्या खेळात 31, नाबाद 33, 31, 61, 3 अशा खेळ्या केल्या आहेत. या दोघांचा खेळ पाहिल्यानंतर स्पष्टपणे जाणवले की, कवडीमोलात घेतलेले हे खेळाडू कोटीमोलाचे ठरले आहेत. त्यांच्या रूपाने पंजाबला कोटींची लॉटरी लागल्याचेही बोलले जात आहे.

सिंग-शशांकप्रमाणे लाखातले खेळाडूच शेकडोंच्या गर्दीत प्रखर प्रकाशझोताप्रमाणे उजळून निघाले आहेत. चेन्नईच्या संघात असलेला मुस्तफिझूर रहमानचेही नाव त्यात घ्यावेच लागते. हा दोन कोटींचा खेळाडू चेन्नईसाठी मोठी कामगिरी करतोय. हा 1 मेनंतर चेन्नईत नसेलही, पण त्याने आताच 11 विकेट घेत आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवली. सोमवारी मुंबईचा अर्धा संघ गारद करणारा संदीप शर्मा तर राजस्थानने 50 लाखांत खरेदी केला होता. तसेच ट्रिस्टन स्टब्स या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूला दिल्ली पॅपिटल्सने 50 लाखांत आपला खेळाडू बनवला आणि या खेळाडूने 8 सामन्यात 50 च्या सरासरीने दोन अर्धशतकांसह 199 धावा ठोकल्या आहेत. यांची अद्भुत कामगिरी पाहून संघमालकांना 10 चे 20 कोटी खर्च करून घेतलेल्या खेळाडूंबद्दल मनात राग खदखदतोय. 20 लाखांच्या अंगकृष रघुवंशीने अर्धशतकासह 118 धावा करत सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडले आहे.

कमी दाम, पण मोठे काम
आयपीएलमध्ये सर्वाधिक खेळाडूंची किंमत 20 लाख रुपये आहे आणि याच खेळाडूंनी आपल्या संघांना आनंदाची बातमी दिली आहे. 20 लाखांत घेतलेल्या अनेक खेळाडूंना फार कमी संधी दिली जातेय, पण जेव्हा त्यांना संधी मिळालीय, त्यांनी संधीचे सोनेही केलीय. यात नेहाल वढेरा, श्रेयस वढेरा, आकाश सिंग, रमणदीप सिंग, नमन धीर यांची नावे प्रामुख्याने घेता येतील. अशा स्वस्तातल्या खेळाडूंची जबरदस्त कामगिरी पाहून परदेशी खेळाडूंवर पैसा ओतण्यापेक्षा आपल्या देशी खेळाडूंनाच अधिक भाव दिला तर आपल्याला आणखी चांगले खेळाडू लाभतील, असा विचार संघमालकाच्या डोक्यात फिरू लागला आहे. त्यामुळे भविष्यात परदेशी खेळाडूंपेक्षा देशी खेळाडूंचीच मागणी वाढण्याची शक्यता आहे.