तुमच्यावर खटला का चालवू नये? सर्वोच्च न्यायालयाचा संतप्त सवाल

बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या फसव्या जाहिरातींविरोधात दाखल याचिकांवर पंपनी आणि आयुष मंत्रालयाला उत्तर देण्यास सांगितले होते; परंतु पतंजली आणि पेंद्र सरकार दोघांनीही अद्याप कोणतेही उत्तर दिले नसून पतंजलीचे बाबा रामदेव किंवा आचार्य बाळकृष्ण हे दोघेही सुनावणीवेळी हजर राहिले नाहीत. त्यामुळे तुमच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल खटला का चालवू नये, असा संतप्त सवाल सर्वोच्च न्यायालयाने केला आणि याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही दिला.

बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण या दोघांना नोटीस बजावून दोन आठवडय़ांच्या आत न्यायालयात हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले. 27 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने पतंजली आणि आयुष मंत्रालयाला तीन आठवडय़ांत उत्तर देण्यास सांगितले होते.

न्यायालयात काय झाले?
– सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजूंचे वकील उपस्थित होते. पतंजलीची बाजू मांडणाऱया मुकुल रोहतगी यांना न्यायालयाने विचारले की, तुमच्याकडून अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही. तुमच्या अशिलाला न्यायालयात हजर राहण्यास सांगा. आम्ही रामदेव आणि बाळकृष्ण या दोघांनाही न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देत आहोत.

– आयुष मंत्रालयालाही सर्वोच्च न्यायालयाने फटकारले. तुम्हीही तुमचे उत्तर सुनावणीच्या एक दिवस आधी का सादर केले नाही, असा सवाल न्यायालयाने केला. यावर उत्तर देण्यासाठी आणखी वेळ द्यावा अशी विनंती आयुष मंत्रालयाने केली.

नेमके प्रकरण काय…
पतंजली आयुर्वेदने 10 जुलै 2022 रोजी वृत्तपत्रात औषधांबाबत जाहिरात दिली होती. यावर इंडियन मेडिकल असोसिएशनने पतंजली आयुर्वेदविरोधात एक रिट याचिका दाखल केली होती. त्यात पतंजली आयुर्वेदकडून अॅलोपॅथी आणि आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धतींबाबत अपप्रचार केला जात असल्याचे म्हटले होते. तसेच ड्रग्ज अॅक्ट 1954 आणि ग्राहक संरक्षण कायदा, 2019 चे उल्लंघन केल्याचा दावाही केला होता.