महेश मांजरेकर अभिनीत ‘जुनं फर्निचर’ लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

सत्य- सई फिल्म्स आणि स्कायलिंक एन्टरटेनमेंट प्रस्तुत ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून नुकताच या चित्रपटाचा टिझर लाँच सोहळा छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे दणक्यात पार पडला. सलीम खान यांच्या हस्ते हे टिझर लाँच करण्यात आले. यतिन जाधव निर्मित, महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित हा चित्रपट 26 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादही महेश मांजरेकर यांचेच आहेत.

महेश मांजरेकर यांचे चित्रपट नेहमीच वेगळ्या धाटणीचे असतात. त्यांचे हे वेगळेपण ‘जुनं फर्निचर’मध्येही जाणवत आहे. या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा!, या टॅगलाईनवरून हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांवर भाष्य करणारा आहे, हे कळतेय. टिझरमधील त्यांचे दमदार व्यक्तिमत्व, भारदस्त आवाज या चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढवते. मुळात हा आपल्या आजुबाजुला घडणारा विषय आहे. हल्लीच्या तरुणाईला घरातील, घराबाहेरील वयस्कर व्यक्ती म्हणजे ‘ओल्ड फर्निचर’ वाटतात. परंतु याच जुन्या फर्निचरचे महत्व या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

यावेळी आशिष शेलार, सदा सरवणकर, अमेय खोपकर, महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, मेधा मांजरेकर, अनुषा दांडेकर या चित्रपटातील कलाकारांसह अनेक स्थानिक, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. यादरम्यान महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांशी संवादही साधला.