औरंगाबाद, उस्मानाबाद नावावरच लोकसभा निवडणूक

निवडणूक आयोगाने मिंध्यांचा प्रस्ताव फेटाळला

परिसीमन आयोगाच्या निर्णयानुसार शहराच्या नावात बदल करण्याची आवश्यकता नसल्याचे पत्र

केंद्रीय निवडणूक आयोगाने मिंधे सरकारने पाठवलेला शहराच्या नामांतराचा प्रस्ताव फेटाळला आहे. आगामी लोकसभा निवडणूक ही औरंगाबाद, उस्मानाबाद या नावांवरच होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासन तसेच निवडणूक अधिकाऱयांना कळवले आहे. परिसीमन आयोगाच्या निर्णयानुसार शहराच्या नावांत बदल करण्याची आवश्यकता नसल्याचे निवडणूक आयोगाने आपल्या पत्रात म्हटले आहे.

मोघली तसेच निजामी अत्याचारांच्या खाणाखुणा कशाला हव्यात, असा सवाल करत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव असे नामकरण केले होते. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर या दोन्ही शहरांची नावे बदलण्यात यावीत, अशी मागणी होत होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी स्वतःच औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव असे नामकरण करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला होता. हा प्रस्ताव मंजूरही करण्यात आला. त्यानंतर गद्दारी करून सत्तेत आलेल्या मिंध्यांनी याच प्रस्तावात थोडा फेरफार केला. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव असे नामांतर केले. सप्टेंबर 2023मध्ये ही माहिती राज्य निवडणूक आयोगाला कळवण्यात आली होती.

परिसीमन कायदा 2002च्या कलम 11/2मधील तरतुदीनुसार 31 जुलै 2006च्या परिसीमन आदेशामध्ये औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नावात करण्यात आलेल्या बदलाची नोंद घेण्यात यावी, असे राज्य निवडणूक आयोगाने 28 सप्टेंबर 2023 रोजीच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे कळवले होते. निवडणूक आयोगाने 5 जानेवारी 2024 रोजी दोन्ही जिल्हय़ांचे जिल्हाधिकारी तसेच निवडणूक कार्यालयांना यासंदर्भात पत्र पाठवून परिसीमन आयोगाच्या निर्णयात कोणताही बदल होणार नसल्याचे म्हटले आहे.