लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिक्षक भरतीला वेग

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिक्षक भरतीला वेग आला असून शालेय शिक्षण आयुक्तालयाने ग्राम विकास विभागाच्या प्रधान सचिवांना तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांना प्रत्यक्ष मतदान झालेल्या ठिकाणी शिक्षकांच्या नियुक्तीबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी या भरती प्रक्रियेबाबत माहिती दिली आहे.

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राबविल्या जात असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेला लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ब्रेक लागला होता. मात्र निवडणूक झालेल्या जिह्यात शिक्षक भरतीची पुढील प्रक्रिया सुरू करण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. त्याबाबत पवित्र पोर्टलवर बुलेटिनदेखील प्रसिद्ध केले असून त्यात जिल्हा परिषदेचे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शिक्षक भरतीसंदर्भातील निर्देश दिल्याचे नमूद केले आहे.

पुढील निवड प्रक्रिया लवकरच

पहिल्या फेरीतील कार्यवाही सुरू असतानाच पुढील निवड फेरी घेण्याच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन करून प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. पुढील फेरीमधील माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूपंपग्रस्त व तत्सम पदांतील वेगवेगळय़ा घटकांच्या मागण्या विचारात घेता समन्यायी पद्धतीने व शासन निर्णयातील सूचनांचे योग्य ते पालन करून कार्यवाही करण्यात येत आहे, असे शिक्षक भरतीबाबतच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन पुढील निवड फेरीसुद्धा लवकरात लवकर घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत.