कोल्हापुरात थर्टी फर्स्टला कडक पोलीस बंदोबस्त, नियमांचे पालन करीत घरातून करा नवीन वर्षाचे स्वागत; पोलिसांचे आवाहन

कोरोना व ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने कडक निर्बंध लावले आहेत. कोल्हापुरात सध्या रात्रीची जमावबंदी सुरू आहे. त्यात ‘थर्टी फर्स्ट’ आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी गर्दी व हुल्लडबाजी टाळण्यासाठी ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत करताना नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे. हुल्लडबाजी, फटाक्यांची आतषबाजी, पुंगळ्या काढून दुचाकी पळवणे, महिलांची छेडछाड आणि ड्रंक ऍण्ड ड्राईव्ह करणाऱयांना रात्र पोलीस कोठडीत काढवी लागणार असल्याचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिला आहे.

नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. मात्र, कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही, त्यामुळे राज्य शासनाने रात्री जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास फिरण्यास मनाई आहे. 31 डिसेंबरच्या जल्लोषी पाटर्य़ांना मनाई करण्यात आली आहे. हॉटेल, डायनिंग हॉल, बार यांना गर्दी टाळण्याचे नियम लावले आहेत. उद्यानातही गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे.

  • पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी जिह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱयांना त्यांच्या हद्दीत नाकाबंदी व गस्त ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. प्रत्येक चौकात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जाणार आहे. दारू पिऊन वाहन चालवणाऱयांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर खटला दाखल केला जाणार आहे. तसेच दुचाकीवरून जाताना कर्णकर्कश हॉर्न वाजवणे, पुंगळ्या काढून सुसाट जाणे, हुल्लडबाजी करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे मुले, वृद्धांनी घरातच ‘थर्टी फर्स्ट’ साजरा करावा, असे आवाहन केले आहे.