तीन लाख रुपयांच्या वसुलीसाठी लातुरात घरात घुसून महिलेचे अपहरण

तीन लाख रुपयांच्या वसुलीसाठी महिलेच्या घरात घुसून शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याची आणि जबरदस्तीने तिचे अपहरण करून डांबून ठेवल्याची घटना लातूर शहरात घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील घटनेप्रकरणी श्रीनिवास धोंडीराम लड्डा (रा. संभाजीनगर) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, फिर्यादीने अभिषेक जावळे आणि त्याच्या साथीदाराकडून तीन लाख रुपये व्याजाने घेतलेले होते. ही रक्कम टप्प्याटप्प्याने त्यांना परतही केली. परंतु, वारंवार पुन्हा ते तीन लाख रुपयांची मागणी करीत होते. फिर्यादीच्या घराच्या कंपाऊंड वॉलवरून उड्या मारून अभिषेक जावळे आणि त्याचे दोन साथीदार घरात घुसले. लाथाबुक्क्याने मारहाण केली, शिवीगाळ केली. फिर्यादीची आई सोडवण्यासाठी आली असता त्यांना अश्लिल शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. जबरदस्तीने घरातून घेऊन गेले. शहरातील एक नंबर चौकातील एस.एस.लॉजवरील एका रूममध्ये त्यांना डांबून ठेवले. अभिषेक जावळे व त्याच्या साथीदाराविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक चव्हाण हे करीत आहेत.