खड्डा बुजवल्यानंतर दोन तासांत वाहतूक सुरू

पावसाळा सुरू झाल्यानंतर आठवडाभरातच रस्त्यावर खड्डे पडल्याच्या शेकडो तक्रारी पालिकेकडे आल्याने पालिकेने अत्याधुनिक ‘रिऑक्टिव्ह अस्फाल्ट’ तंत्रज्ञानाने खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे खड्डा बुजवल्यानंतर अवघ्या दोन तासांत या मार्गावरून वाहतूक सुरू करता येत आहे. मुंबईत पहिल्यांदाच या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे.

पावसाळ्यात खड्डय़ांची समस्या निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन क्रमांकावर गेल्या आठवडाभरात सुमारे दीडशे तक्रारी आल्या आहेत. यातच राज्य सरकारच्या ताब्यातील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गही पालिकेने देखभाल-दुरुस्तीसाठी आपल्या ताब्यात घेतले असताना या रस्त्यांवरही खड्डे पडू लागल्याने पालिकेचे टेन्शन वाढले आहे. या खड्डय़ांमुळे वाहतूककोंडीसह अपघात होण्याचा धोका आहे. त्यामुळे हे खड्डे बुजवण्यासाठी पालिका वेगाने कार्यवाही करण्यात येत आहे. खड्डे बुजवण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिल्या असून वेगाने कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पायाभूत सुविधा उपायुक्त उल्हास महाले यांनी सांगितले. या उपक्रमात खार भुयारी मार्ग येथे गुरुवारी खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले. याठिकाणी रिऑक्टिव्ह अस्फाल्टचा वापर करून तत्काळ रस्ते वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

असे होणार काम

रिऑक्टिव्ह अस्फाल्ट हे केमिकलमिश्रित डांबर आहे. महत्त्वाचे म्हणजे पाण्याच्या संपका&त आल्याने डांबरी रस्त्यावर खड्डे तयार होतात, मात्र रिऑक्टिव्ह अस्फाल्टच्या मिश्रणावर पाणी टाकूनच खड्डा भरण्यात येतो. केमिकलची पावडर, खडी आणि पाणी या मिश्रणाचा वापर खड्डे बुजवण्यासाठी करण्यात येतो. रिऑक्टिव्ह अस्फाल्टमधील केमिकल पावडरवर पाण्याचा कोणताही परिणाम होत नाही. अवघ्या दोन तासांमध्ये वाहतूक सुरू करता येते.

1300 मेट्रिक टन कोल्डमिक्सचा वापर

मुंबईतील सहा मीटर आणि त्यापेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी पालिकेच्या परिरक्षण खात्यामार्फत कोल्डमिक्सचा वापर करण्यात येणार आहे. मुंबईतील सर्व विभागात आतापर्यंत 1300 मेट्रिक टन कोल्डमिक्स खड्डे बुजवण्यासाठी पुरवण्यात आले आहे. तर 200 मेट्रिक टन कोल्डमिक्स राखीव ठेवले आहे.